फुटबॉल

फुटबॉल

फोटो ०२७२३
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मोहमेडन स्पोर्टिंग विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्यात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी झालेली चुरस. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
02731
सामना जिंकणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंचे मैदानावर जाऊन कौतुक करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज.
02732
शिवाजी मंडळाच्या धडाकेबाज विजयानंतर जल्लोष करणाऱ्या युवती.
02733
शिवाजी तरुण मंडळाच्या विजयानंतर प्रेक्षा गॅलरीत झालेला दणकेबाज जल्लोष.


शिवाजी तरुण मंडळाचा ‘मोहमेडन’ला दे धक्का!
---
अनिकेत जाधव ठरला हुकमी एक्का; श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी दिली संघाला शाबासकी
सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १३ : शाहू छत्रपती गोल्ड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज कोलकत्याच्या बलाढ्य मोहामेडन स्पोर्टिंगला नमवत शिवाजी तरुण मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना संपण्यास चार मिनिटांचा अवधी असताना अनिकेत जाधव याने चेंडूला थेट ‘मोहमेडन’च्या गोल जाळीत धाडले आणि उपस्थित फुटबॉल शौकिनांच्या जल्लोषाला उधाण आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही  मैदानावर येऊन शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंची पाठ थोपटली. ‘केएसए’तर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.  
राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या मोहामेडन संघाविरुद्ध शिवाजी मंडळाच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच वेगवान खेळाचे प्रदर्शन घडविले. सामन्यादरम्यान चेंडू दोन्ही संघांच्या क्षेत्रात खेळत राहिला; परंतु समन्वयाचा अभाव राहिल्याने दोन्ही संघांकडून अनेकदा गोल संधी वाया गेल्या. ‘मोहमेडन’चा गणेश बेसरा त्याचप्रमाणे ॲबिल मॅथ्यू यांना दोनदा संधी मिळूनही त्याचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. शिवाजी तरुण मंडळाचा किरण पांढरे यालाही मिळालेली संधी वाया गेल्याने प्रेक्षकांमधूनही हळहळ व्यक्त झाली. त्यानंतर अनिकेत जाधवने पास देऊनही करण बंदरे यालाही संधी साधता आली नाही. त्याने सामना मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.  
स्थानिक शिवाजी तरुण मंडळाचा सामना ‘मोहामेडन’सारख्या बलाढ्य संघाबरोबर होणार असल्याने फुटबॉल शौकिनांनी एकच गर्दी केली होती. गर्दीच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्तरार्ध सुरू झाला. मोहमेडन संघाने शॉर्ट पासिंगचा अवलंब करीत खेळ गतिमान केला. त्यांच्या आक्रमक खेळामुळे शिवाजी मंडळाच्या खेळाडूंमध्ये काहीसा गोंधळ दिसून आला. अनेकदा संधी मिळूनही चेंडू बाहेर मारल्याने संधी वाया गेल्या. दरम्यान, ‘मोहमेडन’ने खेळाडू बदलत व्यूहरचना बदलली. बदली म्हणून आलेला उंचपुरा खेळाडू किटा लाजोने वेगवान चढाया केल्या. यानंतर ‘मोहमेडन’च्या विल्यम लालगुलीनच्या पासवर गणेश बैसाराची गोल करण्याची संधीही वाया गेली. दरम्यान, शिवाजी मंडळाच्या अनिकेत जाधवने मिळालेल्या संधीचा फायदा घेत पेनल्टी क्षेत्राबाहेरून मारलेला फटका ‘मोहामेडन’चा गोलरक्षकने हाताने पंच करून बाहेर काढला. या चढाईनंतर शिवाजी मंडळाच्या संकेत साळोखे, अनिकेत जाधव यांची संयुक्त चढाई ‘मोहामेडन’च्या बचावफळीने परतवून लावली. दरम्यान, आजच्या सामन्याचे उद्‍घाटन ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, किरण पाटील, सतीश घाटगे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, यशराज आणि यशस्विनीराजे छत्रपती, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.

असा झाला निर्णायक गोल
निखिल कदमच्या जागेवर आलेल्या सिद्धेश साळुंखे याने सामना संपण्यासाठी चार मिनिटे असतानाच चेंडूवर ताबा मिळविला आणि डीच्या बाहेरून गोलमध्ये तो जोरदार टोलवला. हा चेंडू गोलरक्षक तोहिन तलुकदर याने अडविला, पण त्याच्या हातातून नेमका चेंडू सुटला आणि त्याच क्षणी डीमध्ये असलेल्या अनिकेत जाधवने मारलेला जोरदार फटका गोलरक्षकला कळेपर्यंत जाळ्यात पोचला होता. निर्धारित वेळेनंतर सामना बरोबरीत संपणार, असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे शिवाजी मंडळाच्या खेळाडूंनी विजयाची संधी साधली व या शानदार निर्णायक गोलने विजय संपादन केला. 

फुटबॉलप्रेमींचा एकच जल्लोष
अनिकेतचा फटका गोलजाळ्यात विसावताच प्रेक्षा गॅलरीतून जोरदार घोषणा देत हजारो फुटबॉल शौकिनांनी एकच जल्लोष केला. महिलांसह मुलींनी झेंडे फडकावत आनंद व्यक्त केला. ‘मोहमेडन’कडून तनवीर आलम, एम. डी. तनवीर, पिल्लंम ललो, सनी मोडले, विल्यम कल्लोळी, एझी प्रिन्स यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन घडविले. शिवाजी मंडळाकडून निखिल कदम, किरण पांढरे, संकेत साळुंखे, करण चव्हाण-बंदरे, शुभम साळुंखे, योगेश कदम यांनी उत्कृष्ट खेळ केला.  

आजचा सामना
दुपारी ४- केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com