कामे पूर्ण...निधीचा नाही पत्ता ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामे पूर्ण...निधीचा नाही पत्ता !
कामे पूर्ण...निधीचा नाही पत्ता !

कामे पूर्ण...निधीचा नाही पत्ता !

sakal_logo
By

कामे पूर्ण...निधीचा नाही पत्ता !
गडहिंग्लज शहर : नगरपालिका वर्षभरापासून दोन कोटी निधीच्या प्रतिक्षेत
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : वर्षभरापूर्वी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून पालिका प्रशासनाकडून कामे पूर्ण केली असली तरी अद्याप निधीचा पत्ता नाही. पूर्ण झालेल्या कामाचे १ कोटी २० लाख तर निविदा प्रक्रिया झालेल्या कामांसाठीचा ८० लाखाचा निधी मिळालेला नाही. यामुळे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारासह पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे.
पालिकेला दरवर्षी विविध योजनांतून निधी मंजूर होत असतो. मंजूर निधीतून घ्यावयाच्या कामांचे इस्टिमेट करुन तो प्रस्ताव तांत्रिक व प्रशासकीय मंजूरीनंतर निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिले जातात. २०२१-२२ मध्ये विशेष रस्ता अनुदान म्हणून १ कोटी २० लाख आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामांसाठी ८० लाखाचा निधी मंजूर झाल्याचे शासनाचे पत्र आले. त्यानुसार १ कोटी २० लाखातून सात कामे प्रस्तावित केली गेली. त्याचे इस्टिमेट, तांत्रिक व प्रशासकीय मंजूरीसह निविदा प्रक्रियाही झाली. या कामामध्ये रस्ते व गटारींचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर दिल्याने संबंधित ठेकेदारांनी सर्व कामे पूर्णही केली आहेत. परंतु कामे पूर्ण होवून वर्ष उलटले तरीसुद्धा अद्याप हा मंजूर निधी पालिकेच्या तिजोरीत आलेला नाही.
स्वत:ची गुंतवणूक करुन काम केलेल्या ठेकेदारांची आता कोंडी झाली आहे. विशेष रस्ता अनुदान योजनेचा निधी प्राप्त नसतानाही निविदा प्रक्रिया करुन वर्क ऑर्डर दिल्याने ठेकेदारांनी निधी येणार या अपेक्षेने सर्वांनीच आपापली कामे पूर्ण केली. त्यानंतर मात्र केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधितांच्या येरझाऱ्‍या वाढल्या आहेत. वर्ष उलटूनही अद्याप निधी नसल्याने प्रशासनासह ठेकेदारही पेचात अडकले आहेत. अलीकडील काही वर्षापासून रुढ झालेली ''अ‍ॅडव्हान्स'' कामाची पद्धत आता ठेकेदारांच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. दरम्यान, हा निधी मिळावा म्हणून पालिका प्रशासनाकडून मंत्रालयातील पायाभूत नागरी विकास विभागाकडे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्या पत्राला उत्तर आणि निधीही नसल्याने प्रशासन हवालदिल झाले आहे. दुसऱ्‍या बाजूने बिलासाठी संबंधित ठेकेदार पालिका कार्यालयाकडे येरझाऱ्‍या मारत असल्याचे सांगण्यात येते. तसेच याच वर्षी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेला ८० लाखाचा निधीही आलेला नाही. या निधीतून कुंभार समाज, लाखे नगरासह इतर ठिकाणी सामाजिक सभागृह व मुस्लिम दफन भूमीस संरक्षक भिंतीच्या कामे होणार आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून आता पालिका या निधीच्या प्रतीक्षेत आहे.
-------------
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
निधी मंजूर झाला आणि थांबला असे सहसा कधी घडत नाही. २०२१-२२ मध्ये मंजूर झालेला निधी मार्च २२ अखेर जमा होणे आवश्यक होते. परंतु वर्ष उलटून गेले तरी या निधीचा पत्ता नाही. पालिका पत्रव्यवहार करुनही काही पदरात पडलेले नाही. सरकार बदलाचा हा परिणाम म्हणावा का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे आता आमदार हसन मुश्रीफ यांनीच लक्ष घालून हा मंजूर निधी तातडीने पालिकेच्या तिजोरीत आणण्यास प्रयत्न करण्याची मागणी आहे.