
अंध बनवायला शिकणार ''एलईडी-सोलर''च्या वस्तू
अंध बनवायला शिकणार
‘एलईडी-सोलर’च्या वस्तू
----
अत्याळला आठ दिवस कार्यशाळा; नेत्रदान चळवळीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : मरणोत्तर नेत्रदान चळवळीतर्फे अंधांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे २१ मेपासून आठ दिवस ही कार्यशाळा चालेल. यात अंधांना एलईडी व सोलरवर चालणाऱ्या वस्तू बनविण्यास शिकवले जाईल. कार्यशाळा मोफत व निवासी आहे.
गडहिंग्लज व आजरा तालुक्यांत सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीचा दहाव्या वर्धापन दिनापासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत नेत्रप्रत्यारोपणातून दृष्टी देता येत नाही, अशा अंधांना मानसिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून तीन महिन्यांपूर्वी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात स्वतंत्रपणे स्वयंसिद्धता कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. आता या तीन तालुक्यांतील अंधांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा होत आहे.
कार्यशाळेत अंधांना विविध प्रकारचे एलईडी बल्ब, ट्यूबलाईट, एलईडी बल्बच्या माळा, सोलरवर चालणाऱ्या विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय, अंधांना योगाचे धडे दिले जातील. प्रेरणादायी वक्त्यांची व्याख्यानेही होणार आहेत. कार्यशाळा अत्याळ येथील प्राथमिक शाळेत होईल. अंध व त्यांच्याबरोबर येणाऱ्या नातेवाइकांच्या राहण्याची, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था केली आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अंधांनी हेमंत इंगवले व संदीप देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
-------------------
कार्यशाळेचे मार्गदर्शकही अंध
रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत मुंबई येथील सागर पाटील अंधांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे श्री. पाटील हेही अंध आहेत. आपल्या अंधत्वावर मात करीत त्यांनी आतापर्यंत २५० हून अधिक अंधांना प्रशिक्षण दिले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी अंधांसाठी तीन वर्कशॉप सुरू करण्यात आली आहेत.