कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी नियोजनबद्ध पाऊल टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी नियोजनबद्ध पाऊल टाकणार
कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी नियोजनबद्ध पाऊल टाकणार

कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी नियोजनबद्ध पाऊल टाकणार

sakal_logo
By

02863
...

कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी
नियोजनबद्ध पाऊल टाकणार

‘चौपाल’ गोलमेज परिषदेत निर्धार; पर्यावरण चळवळीतील विविध संस्थांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः शासन आणि प्रशासनातील यंत्रणेशी योग्य समन्वय साधून पाणी, वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक कचरा निर्मूलनासह कोल्हापूरच्या शाश्‍वत विकासासाठी नियोजनबद्ध पाऊल टाकण्याचा निर्धार पर्यावरण संरक्षण चळवळीतील विविध १८ संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी केला. ‘चौपाल’ गोलमेज परिषदेत त्यांनी एकत्रितपणे पर्यावरण संवर्धन, शाश्‍वत विकासाचे ध्येय, कृती आराखडा ठरवून सामूहिकपणे कार्यरत राहणे आणि त्याचा आढावा, पुढील वाटचाल निश्‍चितीसाठी दर तीन महिन्यांनी गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले.
‘सेतू’ कोल्हापूर आणि पूर्णम इकोव्हिजन फौंडेशनतर्फे शिवाजी विद्यापीठातील अतिथीगृहात गोलमेज परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उदघाटन प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते जांभूळ, सिताफळ बीजरोपणाने झाली. यावेळी जलतज्ज्ञ अनिलराज जगदाळे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, वन्यजीव अभ्यासक सुहास वायंगणकर, ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले प्रमुख उपस्थित होते.
सर्वांनी स्वकेंद्रीत विचार सोडून निसर्गकेंद्री विचार करायला हवा, तरच आपला शाश्‍वत विकास होईल. टाकाऊपासून टिकावू संकल्पनेवर आधारित प्रकल्प राबवून रोजगारनिर्मिती करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. पर्यावरण विषय सर्वांनी समजून घ्यावा. त्याबाबत सर्वांगीण विचार करण्याचे आवाहन जगदाळे यांनी केले. कोल्हापुरातील पाण्याच्या स्त्रोतांचे मॅपिंग करून त्यांचे प्रमाणीकरण करायला हवे. घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर गरजेचा आहे. त्याबाबत काम होणे आवश्‍यक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या परिषदेचा समारोप जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पर्यावरण रक्षण हा सार्वजनिक धोरणाचा विषय आहे. लोकांपर्यंत जावून त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना पर्यावरण संवर्धन, शाश्‍वत विकासात सहभागी करून घेणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने पर्यावरणातील विविध क्षेत्रे ठरवून प्रशिक्षण घेवून त्यात भरीव काम करूया. सर्व चांगल्या उपक्रमांना प्रशासनाची साथ राहील. प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास कोल्हापूरचा शाश्‍वत विकास निश्चितपणे होईल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
या परिषदेत स्नेहल सप्रे (सेतू), आशिष कोंगळेकर (कोल्हापर अर्थ वॉरिअर्स), जयश्री गंगाधरे (वनमित्र संस्था कागल), सागर बकरे (ग्रामविकास फौंडेशन), पराग केमकर (निसर्गमित्र संस्था), प्रसाद वालावलकर (सोलर पॉवर), वर्षा वायचळ, जयश्री कजारिया (गार्डन्स क्लब), गुणकली भोसले (निसर्ग संवर्धन संस्था), अजय कोराणे (असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स), गोपाल खंडेलवाल (व्हीजन इचलकरंजी), अमोल बुड्ढे (वृक्षप्रेमी संस्था), संदीप चोडणकर (चला नदी जाणूया), प्रतिभा ठोंबरे (सिद्धगिरी मठ), प्रशांत पाटील (आधार फौंडेशन), माजी नगरसेवक अजित ठाणेकर, स्नेहल कारेकर, दीपक शिरोडकर, सुहास बट्टेवार, तानाजी भोसले, ऋत्विज पावसकर, नीता वालावलकर आदी उपस्थित होते. ‘सेतू’चे संचालक शशांक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.
....

कोण, काय, म्हणाले?

सुहास वायंगणकर ः कोल्हापूरच्या जैवविविधतेचा अभ्यास करून त्यानुसार संवर्धन, प्रशिक्षण केंद्र वाढवावीत.
संदीप चोडणकर ः उगम ते संगमापर्यंत लक्ष देवून नदीपात्राचा विचार करून विकास करावा.
अनिल चौगुले ः शासनाने पर्यावरण संबंधित कौशल्य विकास कार्यक्रम वाढवावेत.
अजित ठाणेकरः प्रशासनाची मदत घेऊन प्रबोधन, प्रशिक्षणाच्या आधारे पर्यावरण रक्षणात चांगले काम करता येईल.