केआयटीच्या हार्निशने बनवले आपत्ती व्यवस्थापन ॲप

केआयटीच्या हार्निशने बनवले आपत्ती व्यवस्थापन ॲप

2846

हार्निश सावसाणीने बनवले
आपत्ती व्यवस्थापनाचे ॲप

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश; १२ लाखांचे बक्षीस

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हार्निश सावसाणी या विद्यार्थ्याने ‘वेब थ्रीएथॉन’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी त्याने आपत्ती व्यवस्थापन करणारे ॲप आणि वेबसाईट बनवली. यात त्याला द्वितीय क्रमांकाचे १२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. २०२० साली झालेल्या या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्याने बनवलेले ॲप आणि वेबसाईट आपत्ती व्यवस्थापनात उपयुक्त ठरणारे आहे. डाटा ॲनॅलिसिस करून त्याने ही प्रणाली विकसित केली आहे.
‘क्वाईंग डेस्क’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी नासा या अवकाश संशोधन संस्थेने जगभरातील हवामानाशी निगडीत डाटा स्पर्धकांना पुरवला होता. त्यातून स्पर्धकांनी समाजोपयोगी ॲप किंवा वेबसाईट विकसित करावे, अशी स्पर्धेची अट होती. हार्निश हा संगणकशास्त्र शाखेच्या चौथ्या वर्षात शिकतो. लॉकडाउनच्या काळात त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नासाने पुरवलेल्या डाटाचे वेगवेगळ्या पद्धतीने ॲनेलिसिस करून त्याने ‘नासाचेन ॲप’ आणि ‘नासाचेन वेबसाईट’ बनवली. या दोन्ही ठिकाणी आपल्याला सातही खंडांमध्ये वातावरण कसे असणार हे कळते. तसेच कोणत्या विशिष्ट कालावधीत महापूर, भूकंप किंवा अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात याचा अंदाजही ॲप आणि वेबसाईटवरून बांधता येतो. तसेच, आपत्तीमध्ये सापडलेल्या एखाद्या व्यक्तीकडे हे ॲप असेल, तर ती व्यक्ती त्याद्वारे मदत मागू शकते. अशा अनेक आपत्तीग्रस्तांच्या मदतीची यादी ॲपद्वारे आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्यांपर्यंत जाते. त्यामुळे त्याला तत्काळ आवश्यक ती मदत पुरवता येते. विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये ‘ॲडोक टेक्नॉलजी’चा वापर केला गेला आहे. यामुळे आपत्तीमध्ये नेटवर्क गेले तरी ॲप आणि वेबसाईट वापरता येते.
----------------------------------------------------
नासाने दिलेल्या डाटाच्या अधारे हे ॲप आणि वेबसाईट स्पर्धेसाठी बनवली आहे. मात्र, याच प्रणालीचा वापर करून भविष्यात विविध क्षेत्रांत उपयोगी पडतील, असे ॲप बनवता येऊ शकतात. डाटा ॲनेलिसिस करून आपण भविष्यातील अनेक गोष्टींचा बराचसा अचूक अंदाज करता येऊ शकतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ही बाब अनुभवता आली.
- हार्निश सवसाणी (विद्यार्थी, के.आय.टी. महाविद्यालय)
----------------------
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या विषयाशी निगडीच अन्य गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून आपल्या ज्ञानात भर पडतेच, तसेच करिअरचे अनेक मार्गही सापडतात. हार्निशने बनवलेले ॲप आणि त्याचे स्पर्धेतील यश हे केआयटी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.
- अजित पाटील, अधिष्ठाता व संगणकशास्त्र विभागप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com