
पोलिस वृत्त एकत्रित
बत्तीस हजार रुपयांच्या लोखंडी जाळ्यांची चोरी
कोल्हापूर ः जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहिते पार्क येथील शिवदत्त लेकवूड अपार्टमेंटच्या तळघरातून गटारीवरील झाकणाच्या सुमारे ३२ हजार रुपयांच्या आठ लोखंडी जाळ्या चोरट्यांनी लंपास केल्या. सहा ते सात मे दरम्यान ही चोरी झाली आहे. याची फिर्याद ममता सुभाष रायबागे यांनी सोमवारी (ता.१५) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
------
शेंडापार्कातील एमएसईबीच्या गोदामात चोरी
कोल्हापूरः शेंडापार्क येथील एमएसईबीच्या गोदामाचा पत्रा उचकटून सुमारे ७१ हजार १४० रुपयांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. याची फिर्याद कर्मचारी लक्ष्मण बबन गुरव यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शेंडापार्क येथील एमएसईबीच्या गोदामातून लोखंडी उच्च दाबाच्या प्लेटचे १५४ नग, लोखंडी लघु दाब एकूण चार नग, उच्च दाब स्टे बोल्ट एकूण ३८ नग, लघुदाब स्टे बोल्ट एकूण चार नग चोरट्याने लंपास केले. या सर्वांची एकूण किंमत अंदाजे ७१ हजार १४० रुपये आहे. १२ ते १५ मे दरम्यान ही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.
--------------------
मारहाणप्रकरणी तिघा अज्ञातांवर गुन्हा
कोल्हापूरः फुलेवाडी येथील भगवा चौक आणि महापालिकेच्या पंपिंग हाऊस जवळील गंधर्व नगरी येथील कमानीसमोर अनोळखी तिघांनी एकास फुटलेली बिअरची बाटली आणि मार्तुलने मारहाण केली. याची फिर्याद सानेगुरुजी वसाहत परिसरातील गणेश कॉलनीतील अनिकेत मधुकर मांगले यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा १४ मे रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास मोपेडवरून जात असताना फुलेवाडी भगवा चौक येथे त्याला मोटारसायकलीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने अडविले. तेथे शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली लगावली. त्यानंतर सायंकाळी गंधर्व नगरी येथेही दोघांनी मारहाण केली. फुटलेली बिअरची बाटली छातीत मारली. यावेळी फिर्यादीचा मित्र आकाश कोकितकर तेथे त्यांना अडविण्यासाठी गेला. त्यावेळी त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत स्वतः फिर्यादी आणि त्याचा मित्र आकाश दोघेही जखमी झाले. मारहाणीचे कारण समजू शकले नाही. याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
--------------
मातीचा ढिगारा सरकविल्यावरुन हाणामारी
कोल्हापूरः सदर बाजारातील हनुमान मंदिरजवळ मातीचा ढिगारा सरकविल्याच्या कारणातून हाणामारी झाली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. ओंकार शामराव जाधव, उमर आयाज फकीर, सैफ आयाज फकीर, सिद्दक समीर शेख, जरीना सैफ फकीर (सर्व. रा.हनुमान मंदिराजवळ विचारेमाळ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रवींद्र आण्णासाहेब वन्ने यांनी याबाबत फिर्याद दिली.