बचत गटांचे कामकाज होणार गतीमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांचे कामकाज होणार गतीमान
बचत गटांचे कामकाज होणार गतीमान

बचत गटांचे कामकाज होणार गतीमान

sakal_logo
By

बचत गटांचे कामकाज होणार गतीमान
‘लोकोस’ आले मदतीला; गटांच्या नोंदणीसह अन्य कामे होणार गावातच
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : बचत गटांच्या नोंदणीसह अन्य कामे तालुकास्तरावरील कार्यालयातून केली जात होती. पण, गटांची संख्या अधिक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कामकाजाला म्हणावी तितकी गती देणे शक्य होत नाही. मात्र, आता बचत गटांच्या मदतीला लोकोस अॅप आले आहे. या माध्यमातून गावातच बचत गटांच्या नोंदणीसह अन्य कामांची पूर्तता होणार आहे. त्यामुळे बचत गटांच्या कामकाजाला गती मिळणार आहे.
महिला बचत गटांचे जाळे गावागावात विस्तारले आहे. पंचायत समितीतील ‘एमएसआरएलएम’ विभागामार्फत त्यांच्या कामकाजाचे संनियंत्रण केले जाते. बचत गटांची नोंदणी, सदस्यांचा राजीनामा, नव्या सदस्यांचा समावेशासह अन्य कामे या तालुकास्तरीय कार्यालयातूनच केली जातात. बचत गट स्तरावर कागदपत्रांची पूर्तता झाली की ते ऑनलाईन करण्याचे काम येथे होते. मात्र, बचत गटांची संख्या अधिक आहे. कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कामकाजाला म्हणावी तितकी गती देणे शक्य होत नाही.
मात्र, शासनाने आता लोकोस अॅप कार्यान्वित केले आहे. बचत गटांना या अॅपवरच सर्व माहिती भरावी लागणार आहे. बचत गट, ग्रामसंघांची नोंदणी, बचत गटांची ग्रामसंघाला जोडणी, सदस्यांची व्यक्तीगत माहिती, गटाची माहिती यासह विविध बाबींचा यात समावेश आहे. सीआरपी, ग्रामसंघाच्या लिपीकांवर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बचत गटांचे सारे कामकाज आता गावातूनच चालणार आहे. यामुळे तालुक्यातील सर्व बचत गटांच्या कामाचा तालुकास्तरीय कार्यालयावर पडणारा एकत्रित ताण कमी होणार आहे. कामाच्या विभागणीमुळे सहाजिकच बचत गट चळवळीला गती मिळणार आहे.
-------------------
व्यवहारात राहिल पारदर्शकता
अनेक बचत गटांच्या बैठकांत नियमितता राहत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहाराची माहिती ज्या-त्या वेळेला सदस्यांना मिळत नाही. परिणामी, वादाचे प्रसंग घडतात. त्याचे पर्यावसान बचत गट मोडण्यात होते. मात्र, लोकोस अॅपमध्ये बचत गटांना दरमहा आर्थिक व्यवहार अपलोड करावा लागणार आहे. डिजीटल स्वरुपामुळे तो सर्व सदस्यांना केव्हाही पाहता येणार आहे. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता राहण्यास मदत होणार आहे.