
मोबदल्याअभावी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
jsp1621
03190
कोथळी ः येथे कोथळी- हरिपूर पुलासंदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
----
मोबदल्याअभावी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
कोथळी-हरिपूर पूल; काम अंतिम टप्यात आल्याने शासनाकडून उद्घाटनाचे नियोजन
दानोळी, ता. १६ ः कोथळी (ता. शिरोळ) ते हरिपूर (ता. मिरज) हा दोन जिल्हा जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे उरकण्याची शासनाला घाई झाली आहे. येत्या काही दिवसांत उद्घाटनाचे नियोजन आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
२०१९ पासून पुलाचे काम सुरू आहे. भसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. पुलासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. वेळोवेळी या पुलाचे कामही आंदोलन करून बंद केले होते. सांगलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा होतील, असे आश्वासन दिल्यामुळे काम परत चालू केले. अद्याप शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत.
येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उद्घाटनासाठी विरोध दर्शवला आहे. पैसे खात्यावर जमा झाल्याशिवाय उद्घाटन करू देणार नाही, अशी घोषणा केली आहे. सनी मगदूम, रमेश मगदूम, चेतन मगदूम, संतोष मगदूम, कुली मगदूम, प्रविण मगदूम, रवी मगदूम, महादेव मगदूम, विश्वजीत ईसरांण्णा, किरण मगदूम आदी उपस्थित होते.
---------------
हरिपूर कोथळी पुलाची भूसंपादन प्रक्रिया दोन्ही बाजूचे अंतिम मूल्यांकन जाहीर झालेले आहे. चर्चेदरम्यान असे लक्षात आले की प्रत्येक गटामधील भूसंपादनाची रक्कम आपापसात वाटून घेण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्यात एकमत नाही. खात्याने संबंधितांना बोलावून त्यांचे बँकेचे खाते क्रमांक मागितलेले आहेत. परंतु काही गटातील शेतकऱ्यांनी खाते क्रमांक अद्यापही दिलेला नाही. तसेच भूसंपादन झालेल्या जमिनीचा प्रकार जिरायत असा असतानाही त्यांना बागायत दराप्रमाणे मोबदला अपेक्षित आहे. पण ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्य कक्षेबाहेरील आहे.
-ए. ए. क्षीरसागर, शाखा अभियंता, सांगली