
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
शिवाजी विद्यापीठात
विद्यार्थ्यांत हाणामारी
अभ्यासभेटीच्या हिशेबाचे कारण; चौकशीसाठी चौघांची समिती नियुक्त
कोल्हापूर, ता. १६ ः अभ्यास भेटीचा हिशेब देण्याच्या कारणावरून आज सकाळी शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील बी. टेक (फूड टेक्नॉलॉजी अँड सायन्स) अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. कॅम्पसमधील हाणामारीत विद्यार्थी जखमी झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
विभागाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची दीड महिन्यांपूर्वी इंडस्ट्रियल व्हिजिट अंतर्गत म्हैसूर, उटी याठिकाणी अभ्यास भेट आयोजित केली होती. त्यासाठी त्यांनी वर्गणी काढली होती. या भेटीच्या खर्चाचा हिशेब देण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. काल सायंकाळी व्हॉटसअॅप ग्रुपवर पुन्हा याबाबत वाद रंगला. त्याचे पर्यवसान आज सकाळी अकराच्या सुमारास तंत्रज्ञान अधिविभागाच्या कॅम्पसमध्ये थेट हाणामारीमध्ये झाले. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याठिकाणी असलेल्या इतर काही विद्यार्थी, सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे वातावरण निवळले. मात्र, तत्पूर्वी झालेल्या हाणामारीमध्ये त्याच्या डोके, हाताला दुखापत झाली. मित्रांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. दुपारनंतर त्याला विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नियुक्ती केली.
....
‘घडलेल्या प्रकाराबाबत तंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुखांकडून विद्यापीठ प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-डॉ. विलास शिंदे, प्रभारी कुलसचिव
.......................
तणावाचे वातावरण
डोकीत दगड मारल्याची घटना घडल्यामुळे शिवाजी विद्यापीठात तणावाचे वातावरण होते. अशीच काही स्थिती सीपीआर परिसरात होती. कॉलेज तरुणांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. उपचारानंतर विद्यार्थ्याची जखमी म्हणून सीपीआरमध्ये नोंद झाली. मात्र कोणाचीही तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल नसल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.