पूर स्थितीवर लक्ष ठेवा

पूर स्थितीवर लक्ष ठेवा

संभाव्य पूरस्थितीसाठी तहसिलदारांनी दक्ष रहावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता.१६ : ‘जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्व तहसिलदारांनी दक्ष रहावे. शुक्रवार (ता. १९) पर्यंत याचे सूक्ष्म नियोजन करावे’, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्हाधिकारी कार्यालयात १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु केला जाईल. यासाठी, १०७७ हा टोल फ्री क्रमांक सुरु राहील. पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल तर शुक्रवार (ता. १९) च्या बैठकीत तहसीलदारांनी त्याची मागणी करावी. त्याचबरोबर डोंगरी तालुक्यातील भागामध्ये विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ‘दामिनी ॲपव्दारे’ संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे. जिल्ह्यात सद्या काही नवीन अधिकारी बदलून आले असून त्यांनी पूरस्थितीबाधित गावांची त्वरित बैठक घ्यावी. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करु नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.’
जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, घोसरवाड उपकेंद्र, कवठेगुलंद व सर्व तालुका कार्यालयांमध्ये पूरबाधित नागरिकांकरिता बफर स्टॉक स्वरुपात औषध साठा केला आहे. पूरबाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठा हे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावे. त्याचबरोबर नागरिक व पशुधन सुर‍क्षित राहण्यासाठीचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सुमारे ६९० गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवरुन असल्याने पूर कालावधीत नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होणार नाही, याचे नियोजन ग्रामपंचायतीने आत्तापासूनच करावे. ’
यावेळी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे श्री. कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण उपस्थित होते.
....

जनरेटर्स, मशिन्स, बोट
आदींची पूर्वचाचणी घ्यावी

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ म्हणाले, ‘पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. तसेच आपत्ती संदर्भातील व्हॉटस् ॲप किंवा ई-मेलवरुन जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com