‘एमआयडीसी’ शेजारील गावे बनली कचऱ्याची बेटे

‘एमआयडीसी’ शेजारील गावे बनली कचऱ्याची बेटे

लोगो ः ग्राऊंड रिपोर्ट

फोटो 03407
‘एमआयडीसी’ शेजारील गावे बनली
कचऱ्याची बेटे

गायरानात डेपो; प्रक्रिया यंत्रणा नसल्याने ग्रामपंचायतींची अडचण

संतोष मिठारी
कोल्हापूर ः विविध उद्योग, व्यवसायांमुळे औद्योगिक वसाहतींशेजारील (एमआयडीसी) गावांमध्ये रोजगारनिर्मिती झाली. तेथील अर्थचक्राला गती मिळाली. ही एक बाजू असली तरी दुसरीकडे बहुतांश कामगार या गावांमध्ये राहत असल्याने तेथील लोकसंख्या दुप्पटीने वाढली आहे. त्याने साहजिकच पायाभूत सुविधांवरील भार वाढला आहे. तसे पर्यावरण संतुलन बिघडविणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने या गावांच्या ग्रामपंचायतींची मोठी अडचण झाली आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसी शेजारील सहा गावांमधील वास्तव प्रातिनिधिक स्वरूपात मांडले आहे.

लोकसंख्‍येबरोबर कचराही वाढला
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सूतगिरणी, फौंड्री आदी विविध कारखाने, उद्योग आहेत. या एमआयडीसीशेजारी गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, तामगाव, नेर्ली, कणेरीवाडी, कणेरी ही गावे आहेत. या गावांमध्ये बहुतांश कामगार त्यांच्या कुटुंबीयांसमवेत भाडेतत्त्वावरील खोल्यांमध्ये राहत आहेत, तर काहीजण स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या गावांची लोकसंख्या वाढली आहे. त्याने साहजिकच कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रोज किमान अकरा टन कचरा या गावांमध्ये जमा होतो.कचरा संकलित केल्यानंतर तो गायरानात ग्रामपंचायतींकडून डम्पिंग केला जातो. या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारी अथवा त्याचे व्यवस्थापन करण्याची यंत्रणा नसल्याने प्लॅस्टिक कचरा पेटवून देण्याशिवाय पर्याय नसल्याचे अधिक प्रमाणात दिसले. त्याचा परिणाम नाईलाजाने प्रदूषणवाढीवर होत आहे. ते रोखण्यासाठी जिल्हा परिषद, प्रशासनाने या ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मदतीचा हात देणे महत्त्वाचे आहे.

दुर्गंधी, धुराचे लोट
उन्हाळा, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संकलित कचरा पेटविला जातो. त्याने कचरा डेपो असलेल्या याठिकाणाहून गाव, एमआयडीसीमध्ये धुराचे लोट येतात. दुर्गंधी पसरते. रस्त्यांच्या बाजूने प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसतो. पावसाळ्यातील तीन ते चार महिने कचऱ्याचा प्रश्‍न अधिक गंभीर बनतो.

विमानतळ प्राधिकरणाकडून जागा बदलण्याची सूचना
उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीने पुणे-बंगळूर महामार्गापासून जवळ असलेल्या त्यांच्या हद्दीतील गायरानामध्ये कचरा डेपो केले आहेत. त्यातील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पेटविला जातो. त्याचा धूर महामार्गासह गावाच्या काही परिसरात पसरतो. त्यासह विमानाचे लँडिंग करताना हा धूर अडथळा ठरत आहे. त्यावर विमानतळ प्राधिकरणाने कचरा डेपोची जागा बदलण्याची सूचना या दोन्ही ग्रामपंचायतींना पत्राद्वारे केली आहे. त्यावर पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही ग्रामपंचायतींकडून सुरू आहे.

...तर गावांचे मोठे दुखणं दूर होईल
‘एमआयडीसी’ शेजारील या सहा गावांमध्ये वर्षागणिक कचऱ्याचे दुखणं अधिक मोठे होत आहे. तेथील लोकसंख्या आणि संकलति होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता भविष्यात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न अधिक गंभीर होणार आहे. या गावांसाठी मलकापूर, कागल नगरपालिकेच्या धर्तीवर एकत्रितपणे मोठ्या क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प जिल्हा परिषद अथवा जिल्हा प्रशासनाने राबविल्यास कचऱ्याचे मोठे दुखणं दूर होवून दिलासा मिळणार आहे.

ग्रामस्थांनी शिस्त लावून घेण्याची गरज
या सहा गावांतील ग्रामपंचायतींकडून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला तेथील ग्रामस्थांनी भविष्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार करून स्वतः ला काही गोष्टींबाबत शिस्त लावून घेण्याची गरज आहे. त्यात कमीत-कमी कचरा करणे, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे आवश्‍यक आहे.

इतर ‘एमआयडीसी’ शेजारील गावेही त्रस्त
या कचऱ्याच्या प्रश्‍नाने शिरोली एमआयडीसीशेजारील शिये, शिरोली, टोप, नागाव, तर कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीलगतची हुपरी, हलसवडे, तळदंगे, पट्टणकोडोली, कसबा सांगाव, रणदिवेवाडी ही गावे देखील त्रस्त आहेत. शहरातील शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, पांजारपोळ परिसरातही कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न कायम आहे.
.....
चौकट
गावनिहाय रोज संकलित होणारा कचरा
गाव* लोकसंख्या*
उजळाईवाडी*२८ हजार*४ टन
गोकुळ शिरगाव*३० हजार*४ टन
नेर्ली*२० हजार*२ टन
कणेरी*१३ हजार*१ टन
तामगाव*१० हजार*५०० किलो
कणेरीवाडी*८ हजार*२५० किलो

कोट
सरपंच काय म्हणतात?
ग्रामस्थांनी ओला कचऱ्यातून स्वतःच्या परिसरातील झाडांसाठी घरच्याघरी खतनिर्मिती करावी याबाब प्रोत्साहन देत आहोत. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करत आहोत. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू आहे.
-उत्तम आंबवडे, उजळाईवाडी
......................................................................................................
गावबरोबरच आता आम्ही एमआयडीसीमधील कचराही संकलित करत आहोत. सध्या पुणे-बंगळूर महामार्गालगत असलेल्या गायरानामध्ये कचरा डम्प करतो. कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाकडे मागणी करणार आहोत.
-चंद्रकांत डावरे, गोकुळ शिरगाव
..............................................................................................................
ओला आणि प्लॅस्टिक कचरा स्वतंत्रपणे जमा केला जातो. जिल्हा परिषदेने आम्हाला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यंत्रसामुग्री खरेदी करून लवकरच प्रकल्पाची सुरूवात करणार आहोत.
-निशांत पाटील, कणेरी
.........................................................................................................................
गायरानामध्ये असलेल्या मोठ्या खड्यामध्ये कचरा डम्प केला जात आहे. गावाच्या हद्दीतील ओढ्यांमध्ये काही कारखान्यांचे सांडपाणी मिसळत होते. ते थांबविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा परिषदकडे मदतीची मागणी करणार आहे.
-सुरेखा हराळे, तामगाव
.....................................................................................................................
हलसवडे मार्गावरील गायरानामध्ये सध्या कचरा डेपो केला आहे. मात्र, त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना त्रास होत असून, तो टाळण्यासाठी या डेपोची जागा बदलणे. कचऱ्याचे व्यवस्थापन आणि त्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविण्यात येईल.
-प्रकाश धनगर, नेर्ली
......................................................................................................................
घंटागाडीच्या माध्यमातून आठवड्यातील दोन दिवस गावातून कचरा संकलन केले जाते. त्यातून सुमारे २५० किलो कचरा संकलित होतो. या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे पाऊल प्रशासनाच्या मदतीने टाकणार आहे.
-शामल कदम, कणेरीवाडी
.....................................................................................................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com