पुरवठा कार्यालयातील कामे खोळंबली

पुरवठा कार्यालयातील कामे खोळंबली

पुरवठा कार्यालयातील कामे खोळंबली

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १७ : इचलकरंजी पुरवठा कार्यालयातील पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांची बदली होऊन तीन आठवडे झाले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार हातकणंगले येथील अधिकाऱ्यांकडे सोपवला होता. मात्र त्यांच्याकडे अन्य ठिकाणचे अतिरिक्त कार्यभार असल्याने इचलकरंजी पुरवठा कार्यालयामधील कामे खोळंबली आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अपर तहसील कार्यालयातील सुरेखा पोळ यांच्याकडे पुरवठा कार्यालयाचा कार्यभार सोपवला आहे. मात्र त्या २२ तारखेपर्यंत रजेवर असल्याने नागरिकांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इचलकरंजी पुरवठा कार्यालयामध्ये संजय गांधी पेन्शन योजना, शिधापत्रिका संबंधित कामे, सर्व प्रकारचे दाखले, प्रतिज्ञापत्र तसेच रेशनिंग धान्य वाटपासंदर्भातील कामे होत असतात. याच्या नोंदीसाठी कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर, आवक-जावक रजिस्टर, दुबार रजिस्टर, नवीन विभक्त चलन, रेशनकार्ड, मंजूर रजिस्टर आहे. मात्र कार्यालयात अधिकारी नसल्याने व अपुरे कर्मचारी असल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. २८ एप्रिलला पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांची बदली झाली. या वेळी कार्यालयाचा कार्यभार सोपवलेल्या आधिकाऱ्याकडे आधीच सुमारे तीन ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार असल्याने येथील कामे ठप्प राहिली. त्यातच कार्यालयाचा भार केवळ एकाच कर्मचाऱ्यावर पडल्याने नागरिकांना किरकोळ कामासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
पुरवठा कार्यालयामधून ऑनलाईन कामे करण्यासाठी लॉगिन आयडी महत्त्‍वाचा असतो. पुरवठा अधिकाऱ्‍याच्या बदलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉगिन आयडी बदलून घ्यावा लागतो. मात्र कार्यालयात पुरवठा अधिकारीच उपस्थित नसल्याने कार्यालयामधून होणारी ऑनलाईन कामे रखडली. नागरिकांकडून वाढणाऱ्या तक्रारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इचलकरंजी अप्पर कार्यालयातील पोळ यांच्याकडे कार्यभार सोपवला आहे. मात्र त्याही रजेवर असल्याने रेंगळलेली कामे सुरळीत होण्यासाठी अन्य कर्मचाऱ्यांच्या लॉगिन आयडीवर काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
-----------
लाभार्थ्यांच्या कार्यालयात चकरा
रेशनिंग दुकानामधून मिळणाऱ्या धान्याच्या ऑनलाइन सर्व्हर यादीतून अनेक लाभार्थीची नावे तांत्रिक कारणाने गहाळ होत असतात. ही समस्या प्रत्येक महिन्यास निर्माण होत असते. गहाळ झालेल्या लाभर्थ्यांची नावे पुन्हा यादीत नोंद करून घेण्यासाठी पुरवठा अधिकारी व लॉगिन आयडीची आवश्यकता असते. मात्र आयडी बदलून घेण्यासाठी अधिकारीच नसल्याने लाभार्थ्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
----------
पुरवठा कार्यालयामधून होणाऱ्या ऑनलाईन कामासाठी अपर तहसील कार्यालयातील अव्‍वल कारकून यांचा लॉगिन आयडी काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तो दोन दिवसांमध्ये मिळेल त्यामुळे खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
-शरद पाटील, अपर तहसीलदार, इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com