
गडहिंग्लज बाजार समिती
03356
------
गडहिंग्लज बाजार समितीच्या
सभापतीपदी राष्ट्रवादीचे अभय देसाई
बिनविरोध निवड : उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र शेंडूरे
गडहिंग्लज, ता. १७ : येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय देसाई यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी भाजपच्या रविंद्र शेंडूरे यांना संधी मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या.
आर्थिक अडचणीतील गडहिंग्लज बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक खर्चाचा बोजा टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष-गटांच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध केली होती. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडीतही हाच सामंजस्यपणा पुन्हा एकदा दिसून आला.
सभापतिपदासाठी अभय देसाई यांचा तर उपसभापतिपदासाठी रविंद्र शेंडूरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने श्री. गराडे यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. देसाई यांना रामगोंड पाटील सूचक तर भावकू गुरव अनुमोदक आहेत. शेंडूरे यांना अशोक चराटी सूचक तर रामदास पाटील अनुमोदक आहेत. सभेला सर्व संचालक उपस्थित होते.
दरम्यान, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत नुतन सभापती, उपसभापतींचा सत्कार झाला. श्री. पाटील म्हणाले, ‘बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीचे श्रेय सर्वांचे आहे. मी निमित्तमात्र आहे. राजकीय पक्षाच्या संख्याबळाचा विचार न करता बाजार समितीचा कारभार चालवावा. विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. कर्मचाऱ्यांनीही गट-तट न पाहता काम करावे.’ आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहावे.‘गोडसाखर’चे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक विद्याधर गुरबे, माजी संचालक अमर चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, प्रभाकर खांडेकर यांचीही भाषणे झाली. यावेळी रामाप्पा करिगार, जयसिंग चव्हाण, चंद्रकांत सावंत, संभाजी पाटील यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...
* असा आहे फॉर्म्युला ...
पुढील पाच वर्षांसाठी सभापती व उपसभापती पदांची विभागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला पहिल्या व चौथ्या वर्षी, भाजपला तिसऱ्या व पाचव्या वर्षी तर काँग्रेसला दुसऱ्या वर्षी संधी मिळणार आहे. उपसभापतीपद भाजप, जनता दल, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट) यांना अनुक्रमे एक-एक वर्ष संधी दिली जाणार आहे.