
शासन निकषानुसार बेघरांचे अतिक्रमण नियमित करावे
शासन निकषानुसार बेघरांचे
अतिक्रमण नियमित करावे
आमदार प्रकाश आवाडे; प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
इचलकरंजी, ता. १७ : उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे निष्कासित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू झाली असून महसूल विभागाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीला योग्य ते उत्तर देण्यासह आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी. शासन निकषानुसार जे बेघर असतील त्यांचे अतिक्रमण नियमित करावे, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे केली. याबाबत प्रांत कार्यालयात बैठक झाली.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार असल्याने अतिक्रमण काढण्यास विरोध होत आहे. या अनुषंगाने अतिक्रमणधारकांची बाजू घेत सर्वोच्च न्यायालयात आमदार प्रकाश आवाडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन याबाबत उच्च न्यायालयातच दाद मागण्याविषयीचे आदेश न्यायालयाने दिले होते. शासन निकषानुसार अतिक्रमणे नियमित करावीत यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांत कार्यालात बैठक आयोजित केली होती.
या वेळी आमदार आवाडे म्हणाले, ‘‘ज्या भूमीहीन लोकांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना यापूर्वी शासनातर्फे प्लॉट अलॉटमेंट दिले आहे. रितसर सनद देण्यात आली आहे. तरीही त्यांना अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटिसा लागू केल्या आहेत. ही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून असून नागरिक तेथे वर्षानुवर्षे राहत आहेत. जे खरेच भूमीहीन आहेत त्यांना नियमित करावे, तसेच जर खरोखरच कोणी अतिक्रमण केले असेल तर ते निश्चितपणे हटवावे.’’ या वेळी अपर तहसीलदार शरद पाटील, प्रकाश दतवाडे, सूरज बेडगे, राजू मगदूम, राजेश पाटील, स्नेहल कांबळे, संगीता नरंदे उपस्थित होते.