
इचलकरंजीत विकासकामांना गती येणार
इचलकरंजीत विकासकामांना गती येणार
मनपाकडून १५ कोटीच्या निविदा: रस्ते, गटारींसह विविध ८४ कामांचा समावेश
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ ः शहरात पुन्हा एकदा विविध विकास कामांचा धडाका सुरु होणार आहेत. तब्बल १५ कोटी ७९ लाखांच्या विविध विकास कामांच्या निविदा महापालिकेने काढल्या आहेत. एकूण ८४ विकासकामांचा समावेश असून यामध्ये रस्ते, गटारींसह अनेक महत्वपूर्ण अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांचा समावेश आहे. यातील काही कामे पावसाळ्यापूर्वी सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ७६ विकास कामे निश्चीत केली आहेत. तब्बल १२ कोटी १९ लाखांची ही कामे आहेत. यामध्ये रस्ते, गटारी या नागरी सुविधांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. त्यानुसार शहरातील जवाहरनगरसह शहराच्या वाढीव भागातील रस्ते व गटारी करण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी गटारी खराब झाल्या आहेत. या गटारी नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते व गटारीचे प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहेत. दरम्यान, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध ८ विकासकामे करण्यात येणार आहेत. तब्बल तीन कोटी ६० लाखांची ही कामे आहेत.
----
नियोजीत वैशिष्टयपूर्ण कामे दृष्टीक्षेप
विकास कामे - निविदा रक्कम
१) कोल्हाटी समाज स्मशानभूमी आरसीसी हॉल * २१ लाख ६८ हजार
२) जुनी लिंगायत स्मशानभमी संरक्षक भिंत * ३३ लाख ७३ हजार
३) वेदपाठ शाळा इमारत नुतनीकरण * १४ लाख ५० हजार
४) रविंद्रनाथ टागोर वाचनालय बळकटीकरण * १२ लाख ६८ हजार
५) जिम्नॅशियम हॉल पत्रे बसवणे * २० लाख ९७ हजार
६) रविंद्रनाथ टागोर लंच शेड उभारणी * ७ लाख ७९ हजार
७) पंचगंगा स्मशानभूमी पत्रे बदलणे * ६ लाख ७४ हजार
८) आठवडा बाजार महिलांसाठी स्वच्छतागृह * २५ लाख १५ हजार
९) शांतीनगर मुस्लीम कब्रस्तान सुधारणा * ४१ लाख ३ हजार
१०) रमाई आवासमधील शौचालयांसह अन्य कामे * १ कोटी १८ लाख
११) बौध्द विहार इमारत बळकटीकरण * ८५ लाख ५८ हजार
१२) रोहिदास समाज इमारत बळकटीकरण * २३ लाख ९ हजार
------------
मक्तेदारांमध्ये खुशीचे वातावरण
महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. सभागृहाचे अस्तित्व संपल्यानंतर विकासकामे ठप्प होती. तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. त्यामुळे या कामांवर मक्तेदारांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे. तर काही अन्य यंत्रणाही सक्रीय झाल्या आहेत. एकूणच यातील कामे मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यासाठी धडपड सुरु आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत ५ जूनपर्यंत आहे.