
खूनाचा फॉलोअप
खूनप्रकरणी निखिल गवळीला
२२ पर्यंत पोलिस कोठडी
कोल्हापूर, ता. १७ ः घरावर करणी केल्याच्या संशयावरून खून केलेल्या निखिल रवींद्र गवळी याला आज न्यायालयात हजर केले असता २२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने हे कृत्य कसे केले, यासह इतर माहिती अधिक तपासात पुढे येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
टेंबलाई उड्डाण पुलाशेजारील बीएसएनएल टॉवर चौकातील झोपडपट्टीत काल रात्री करणी केल्याच्या संशयावरून घरी जेवायला बसलेल्या कुटुंबावर निखिलने छोट्या तलवारीने वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केला. यात आझाद मुकबुल मुलतानी यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह सीपीआरमध्ये होता. तेथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. सकाळी त्यांचा दफन विधी झाला. त्यांच्यावर हल्ला करताना त्यांना अडविण्यासाठी पुढे आलेल्या जखमी सुनेवर सीपीआरमध्ये उपचार झाले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, निखिलने हे कृत्य का केले?, खुनासाठी आणलेली छोटी तलवार त्याने कोठून खरेदी केली? याची माहिती घेतली जाणार आहे. पूर्णपणे शुद्धीत असतानाही त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती राजारापुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. काल खून करून निखिल पोलिस ठाण्यात हजर झाला तेव्हा तो थेट त्यांच्याकडेच गेला होता. तेव्हा त्याने करणी केल्यामुळेच खून केल्याची कबुली तेथे दिली होती.
दिवसभरात निखिलला भेटण्यासाठी त्याचे कोणीही नातेवाईक तिकडे फिरकले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काल रात्रीपासून आजही दिवसभर मृत मुलतानी यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.