
अडचणींचा डोंगर; शेवटची संधी
03555
--------------------------------
अडचणींचा डोंगर; शेवटची संधी
गडहिंग्लज बाजार समिती; खर्चाला कात्री लावली तरच अस्तित्व
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असित्वासाठी सर्वांनीच त्यागाची भुमिका घेत निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवला. दर निवडणुकीवेळी समितीच्या उर्जितावस्थेच्या केवळ घोषणाच होतात. प्रत्यक्षात मागील पानावरून पुढे असाच कारभार राहिल्याने समिती गाळात रुतत गेली. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांनी खर्चाच्या उधळपट्टीला कात्री लावली तरच समितीचे अस्तित्व टिकणार आहे. समितीला रुळावर आणण्याची ही शेवटची संधी असल्याने कर्मचाऱ्यानींही डोळे उघडून काम करण्याची अपेक्षा शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे साडे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गुळ, मिरची, भुईमूग आणि जनावरांची आवक घटल्याने समितीच्या उत्पन्नाचा झरा आटला. त्यातच भुखंड कवडीमोल दराने दिल्याने अडचणीत भर पडली. सुमारे ५० लाखाच्या घरात उत्पन्न असताना कोटीच्या घरात खर्च आहे. कर्मचारी दोन वर्षापासून वेतनाअभावी भुकेलेले आहेत. नव्या उत्पन्नाच्या स्त्रोताच्या नावाखाली खाऊगिरीच्या चर्चेने आमदन्नी अठ्ठणी खर्चा रुपया अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे. पदाधिकारी येतात-जातात, पण समिती टिकली तरच आपण टिकणार याचे भान ठेवून कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
अमृतमहोत्सवी ही बाजार समिती सीमाभागात विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध आहे. ही ओळख तयार करण्यात तीन पिढ्यांतील स्थानिक व्यापाऱ्यांचा मोठा वाटा आहे. समितीची मध्यवर्ती नजरेत भागात ४५ एकर जागा जमेची बाजू आहे. त्याचा भाडे तत्वाने वापराचा आराखडा करून नियोजनपूर्वक अमंलबजावणी केल्यास हमखास उत्पन्न मिळू शकेल. शेतकरी, व्यापारी यांना अधिक सोयीसुविधा देण्याची गरज आहे. व्यावहारिक योग्यता न तपासता सुरु केलेले उत्पन्नाचे स्त्रोत पांढरा हत्ती ठरू नयेत याची काळजी घ्यावी लागेल.
-------------
जबाबदारी नेत्यांची
गेल्या साडेतीन दशकापासून समितीवर सर्वपक्षीयांची सत्ता आहे. बाजार समिती दोन-चार वर्षात अंदरबट्यात आलेली नाही. दशकभरापासून हा तोट्याचा सिलसिला सुरु आहे. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांची वर्णी हेच ध्येय न ठेवता बाजार समिती टिकावी यासाठी गटनेत्यांनीच आढावा घेत वेळोवेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचायला हेवत. विशेषतः आमदार राजेश पाटील यांनीच कारभारावर अंकुश ठेवला तरच बिनविरोध निवडणुकीची ऐतिहासिक कामगिरी सार्थकी लागेल.