शेतीकामाला जाणवतेय मजूरांची टंचाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीकामाला जाणवतेय मजूरांची टंचाई!
शेतीकामाला जाणवतेय मजूरांची टंचाई!

शेतीकामाला जाणवतेय मजूरांची टंचाई!

sakal_logo
By

शेतीकामाला जाणवतेय मजूरांची टंचाई!
लग्नसराईचा परिणाम; अधिक पगारामुळे वाडपी कामाला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : कृषी क्षेत्रात कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीकामाला मजुरांशिवाय पर्याय नाही. काही कामे ही मजुरांकरवीच करावी लागतात. मात्र, सध्या मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. लग्नसराईमुळे शेतीकामाला मजूर मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. महिलांना शेतीकामाच्या तुलनेत वाडपी कामासाठी अधिक पगार मिळत आहे. त्यामुळे कमी कष्टाच्या या कामाला प्राधान्य देताना दिसत आहेत.
उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊस भांगलणीची कामे सुरु आहेत. तसेच खरिप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतातील तणकट वेचणीसह अन्य अनुषंगीक कामे सुरु झाली आहेत. मात्र, शेती कामासाठी मजूर मिळणे अडचणीचे ठरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. मूळात नवी पिढी शेतीकामापासून दुरावलेली आहे. सहाजिकच त्याचा परिणाम शेतातील मजुरांची संख्या घटण्यावर झाला आहे. त्यात सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. अलीकडे लग्नासह अन्य समारंभात वाडप्यांचे प्रस्थ वाढलेले आहे. पूर्वी नातेवाईक, मित्रमंडळींकडून ही जबाबदारी पार पाडली जात होती. पण, अलीकडे अगदी ग्रामीण भागातही जेवण वाढण्याची जबाबदारी पगारी लोकांवर सोपवली जात आहे. ही कामे विशेषत: महिला करत आहेत.
शेतातील कामापेक्षा वाडपी कामासाठी ५० ते १०० रुपये अधिकचे मिळतात. शिवाय हे काम सावलीमधील आहे. सध्याचा उन्हाचा तडाखा विचारात घेता सावलीत काम करणे अधिक सोईचे मानले जात आहे. वाडपी कामासाठी गेल्यानंतर दोन वेळचे जेवणही त्याच ठिकाणी होते. या साऱ्याचा विचार करुन महिलांकडून वाडपी कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतीकामासाठी मजूर मिळवताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.
--------------------------
ऐरा-पैराच ठरतोय सोईचा
शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. अशा परिस्थितीत ऐरा-पैराच सोईचा ठरत आहे. आपल्या शेतात कामासाठी आलेल्यांच्या शेतात जाऊन कामाची भरपाई केली जाते. एकेकाळी हीच पद्धत प्रचलित होती. कालौघात ती मागे पडली होती. पण, सध्याच्या बदलत्या परिस्थितीत पुन्हा ऐरा-पैराच सोईचा ठरत असल्याचे दिसून येते.