
अंबाबाई मंदिर कृती समिती निवेदन
03574
अंबाबाई मंदिरात भाविकांना मूलभूत सुविधा द्या
शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर, ता. १८ ः साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना असुविधांना सामोरे जावे लागते. या असुविधा दूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन आज कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी यांच्या सहायक सचिव यांच्याकडे दिले.
निवेदनात म्हटले आहे, अंबाबाई मंदिर परिसरात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. परिणामी, पर्यटक भाविक पुन्हा कोल्हापुरात येण्याचा विचार करत नाहीत. याचा फटका पर्यटनवाढीला बसत आहे. मंदिरातील रोजच्या धार्मिक विधी व कार्यक्रमांचे वेळेसहीत दर्शनी बोर्ड लावावेत. मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे. मंदिरातील नोकर भरती शासकीय नियमांनुसार करावी. मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्रे असावीत. तेथे २४ तास जनसंपर्क अधिकारी असावा. गरुड मंडप जीर्णोद्धार, तसेच मणकर्णिका कुंडाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे. परिसरात पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, व्हीलचेअर, रुग्णवाहिका उपलब्ध करावी. मंदिर परिसरात भाविकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. तेथे मुबलक पाणी व इतर सुविधा द्याव्यात. मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करावा. कचऱ्याचा उठाव तातडीने करावा. मंदिर परिसरात असेलेले पार्किंग बंद करून पार्किंगसाठी ४ ते ५ एकर राखीव जागा असलेल्या शाहूपुरी गाडी अड्डा येथे पार्किंग सुविधा करावी. येथून मंदिराकडे येण्यासाठी शासकीय दर ठरवून शासकीय व खासगी वाहनांची सुविधा द्यावी. तेथेच सुसज्ज पार्किंग, यात्री निवास बांधावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अंजली जाधव, प्रकाश आमते, राजू माळेकर, महादेव जाधव, अशोक पाटील, महादेव पाटील, दीपक गायकवाड, जलराज कदम, रामभाऊ कोळेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, सुरेश कदम, राजाराम कांबळे, पंपू सुर्वे उपस्थित होते.