
प्रा. डॉ. रूपा शहा बातमी
03776
‘सहकारात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा
पाया भक्कम करण्याची क्षमता
‘आय.एस.एस.सी’च्या कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर
कोल्हापूर, ता. १९ : ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करण्याची क्षमता सहकारामध्ये आहे आणि म्हणूनच तरूणांनी सहकार क्षेत्राबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सहकाराकडे वळायला हवे, असे मत इंडियन सोसायटी फॉर को-ऑपरेटिव्ह स्टडीज तसेच महावीर महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभागातर्फे झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत इंडियन सोसायटी फॉर को-ऑपरेटिव्ह स्टडीजच्या पुणे विभागाचे सचिव डॉ. अनिल कारंजकर, मंत्रालयातील कक्ष अधिकारी एस. बी. पाटील, ऑडिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे एस. एस. जाधव, प्रा. डॉ. रूपा शहा यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे होते.
डॉ. कारंजकर यांनी सहकार क्षेत्रातील करिअरच्या संधीवर मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, ‘प्रामाणिक व जागरूक सभासद आणि नितीमान संचालक मंडळ असेल तरच सहकार यशस्वी होतो.’ चार्टर्ड अकौंटंट सुनिल नागांवकर यांनी कोल्हापूरमधील सहकार चळवळीचा आढावा घेतला. उत्कृष्ट संवादकर्ता म्हणून सिद्धेश हजारेची निवड झाली. प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय ओमासे यांनी केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले. प्रा. अवधूत कांबळे व प्रा. समीक्षा परब यांनी परिश्रम घेतले.