
36 गुन्हे उघडकीस 35,83,300 मुद्देमाल जप्त
03782
------------
आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीला अटक
३६ गुन्हे उघडकीसः ३५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. १९ ः सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या चोरट्यासह जबरी चोरी व घरफोडी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सर्वजण कर्नाटकातील असून त्यांच्याकडून एकूण ३६ गुन्हे उघडकीस आले असून ३५ लाख ८३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा येथील गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असून त्यांचे मुंबई कनेक्शन आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांत सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा नीतेश उर्फ दीपू जगनाथ डफाळे (वय ३७, रा. प्लॉट नं. ३८, चंद्र माऊली कॉलनी, रुक्मिणीनगर, बेळगाव, ता. जि. बेळगाव, कर्नाटक), शुभम सुनील सूर्यवंशी (१९, रा. आर. पी. डी. कॉलेज रोड, दुसरे गेट जवळ, बेळगाव), उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा (३५, रा. जमनटळ्ळी, ता. सकलेशपूर, जि. हासन, कर्नाटक), राजू सल्वराज तंगराज (३५, रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा) व भीमगोंडा मारुती पाटील (३६, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.
अटक केलेल्या सर्वांनी मिळून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व चैनीकरिता बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून लोकांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, मोटारसायकलवरून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणे यासह अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत. चैनीकरिता त्यांचा हा नित्याचा व्यवसाय बनला व त्यातूनच या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यांत गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांची ओळख कारागृहात झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस अंमलदार नितीन चोथे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कागल येथील लक्ष्मी टेकडीजवळ सापळा रचून कोल्हापुरात चेन स्नॅचिंग करण्यासाठी येणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांनी मंगळवार पेठेतील महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून नेल्याचा गुन्हा कबूल केला आहे. तेथूनच पुढे सर्वांचा भांडाफोड झाला.
-------
चेन स्नॅचिंगचे एकूण १७ गुन्हे
आरोपींनी आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात १२ गुन्हे, कर्नाटक राज्यात ५ गुन्हे असे चेन स्नॅचिंगचे एकूण १७ गुन्हे, घरफोडी- चोरीचे जिल्ह्यात १४ गुन्हे, सोलापूर जिल्ह्यात १ गुन्हा व कर्नाटक राज्यात २ गुन्हे असे घरफोडी चोरीचे एकूण १७ गुन्हे, बेकायदेशीर ९ एमएम पिस्टलचे २४ जिवंत राऊंड व एक मॅगझिन कब्जात बाळगल्याबाबत एक गुन्हा तसेच मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा, असे एकूण ३६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
------
रामेगौडाचा बनावट नावाने वावर
संशयित आरोपी उमेश रामेगौडा हा कृष्णा अशोक तलवार (हुबळी, ता. धारवाड, कर्नाटक) या टोपण नावाने वावरत होता. त्याच्यावर कर्नाटक राज्यात खून व खुनाचा प्रयत्न अशा दोन गुन्ह्यांमध्ये वॉरंटमध्ये पाहिजे आहे, असे गुन्हे नोंद आहेत. बनावट नावाने तो वावरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
-------
३५ हजारांचे बक्षीस जाहीर
अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे तसेच पोलिस अंमलदार नितीन चोथे, प्रकाश पाटील, विनायक चौगुले, हरिष पाटील, खंडेराव कोळी, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे, संजय कुंभार, संजय हुंबे, तुकाराम राजिगरे, सोमराज पाटील, सागर कांडगावे, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, रफिक आवळकर व राजेंद्र वरंडेकर यांनी हा तपास केला. त्यांना ३५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
-------------
अटक आरोपींविरुद्ध दाखल झालेले गुन्हे
आरोपी दाखल गुन्ह्यांची संख्या
नीतेश ऊर्फ दीपू जगनाथ डफाळे ४६
शुभम सुनील सूर्यवंशी १९
उमेश ऊर्फ लिंगराज रामेगौडा २२
राजू सल्वराज तंगराज ६४
भीमगोंडा मारुती पाटील ३७