
यंदा अकरावी वाणिज्य इंग्रजी, विज्ञानचे ऑनलाईन प्रवेश
वाणिज्य इंग्रजी, विज्ञानचे प्रवेश यंदा ऑनलाईन
अकरावी प्रवेश प्रक्रियाः कला, वाणिज्य मराठीची कॉलेजमध्ये प्रक्रिया ; फेरींची संख्या वाढणार
संतोष मिठारी, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः शहरातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा बदल करण्यात आला आहे. केवळ वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेच्या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. गेल्यावर्षी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी दाखल झाल्याने कला आणि वाणिज्य मराठी माध्यम विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय (कॉलेज) पातळीवर राबविली जाणार आहे. प्रवेश फेरींची संख्या पाचपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला आहे.
मागील चार वर्षांपासून अकरावीच्या कला शाखेसाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज कमी येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून कला शाखा वगळण्यात आली. या शाखेसाठी कॉलेज पातळीवर अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या शाखेबरोबरच वाणिज्य मराठी शाखेसाठी देखील मागील वर्षी क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. ते लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया समितीने यावर्षी वाणिज्य मराठी माध्यम देखील ऑनलाईन प्रक्रियेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा केवळ वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेची ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
..........
कमला कॉलेज मुख्य केंद्र
प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र कमला कॉलेज राहणार आहे. यावर्षी शहरातील २७ कॉलेजसाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरवर्षी दोन प्रवेश फेऱ्या होतात. यंदा त्यांची संख्या पाचपर्यंत वाढविण्याचे नियोजन समितीने केले आहे. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यापूर्वी ऑफलाईन प्रक्रिया होती.
......
समितीकडून तयारी सुरू
शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी केंद्रीय समितीने सुरू केली आहे. विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या ऑनलाईन प्रक्रियेचे संगणक प्रणालीचे काम करण्यात येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेतली असल्याचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष महेश चोथे यांनी सांगितले.
.......
शाखानिहाय प्रवेश क्षमता
वाणिज्य इंग्रजी* १६००
वाणिज्य मराठी*३३६०
विज्ञान*५९६०
एकूण*१०९२०
.........
गेल्यावर्षीचे प्रवेश दृष्टिक्षेपात
शाखा*एकूण झालेले प्रवेश* शिल्लक जागा
विज्ञान*४२९०*१६७०
वाणिज्य मराठी*१२५०*२११०
वाणिज्य इंग्रजी*९१५*६८५
........
कोट
‘कला, वाणिज्य मराठीसाठी गेल्यावर्षी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित झाले. त्यामुळे यावर्षी या दोन्ही शाखांची प्रवेश प्रक्रिया कॉलेजपातळीवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-डॉ. तेजस्विनी मुडेकर, कार्याध्यक्ष, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती
........
कला शाखेच्या ८९७६ जागा रिक्त
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ६० टक्के म्हणजे ८९७६ जागा रिक्त राहिल्या. कला मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाखेत एकूण ८१७ विद्यार्थी प्रवेशित झाले होते.