मंगळवार पेठेतील रस्ता बंद

मंगळवार पेठेतील रस्ता बंद

कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना रस्ता वाहतूकीस १० दिवस बंद
कोल्हापूर, ता. १९ : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना या मुख्य रस्त्यावर महापालिकेच्यावतीने दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारपासून (ता.२१) हा रस्ता वाहतुकीसाठी दहा दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे लाड चौक, खरी कॉर्नरमार्गे तसेच इतर पर्यायी रस्त्यावरून वाहतूक वळवली जाणार आहे.
या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाईपलाईन टाकावी लागणार असल्याने रस्ता पूर्ण बंद करण्यात येणार आहे. दक्षिणेकडील उपनगरे तसेच ग्रामीण भागातील शहरात येणारी बहुतांश वाहतूक या रस्त्यावरून ये-जा करते. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मार्गदर्शना खाली या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे. संभाजीनगरकडून मिरजकर तिकटीकडे येणारी वाहतूक नंगीवली चौकाकडून लाड चौक ते महाद्वार रोड या मार्गाने तसेच वारे वसाहत, महादेव मंदिर, पद्मावती चौक ते मंगेशकर नगर मार्गे गोखले कॉलेज चौक अशी दोन मार्गांनी वळवली आहे. मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते लाड चौक ते पाण्याचा खजिना तसेच मिरजकर तिकटी ते केशवराव भोसले नाट्यगृह ते रावणेश्वर मंदिर ते गोखले कॉलेज चौक या पर्यायी मार्गाने वळविली आहे. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

चौकट
केएमटी बस व वाहतूक कोंडी
मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या विविध मार्गावरील केएमटी बसचा हा रस्ता मुख्य मार्ग आहे. लाड चौक, खरी कॉर्नर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. ती दुहेरी केली आणि केएमटी बस त्यावरून सोडल्यास या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते. पाण्याच्या खजिना चौकातून लाड चौकात वळताना दोन्हीकडील बस एकावेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसचा मार्ग बदलावा लागेल. तसेच दैवज्ञ बोर्डिंग, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर येथील एकेरी मार्गही दुहेरी वाहतुकीसाठी खुले करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com