शिवाजी विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल साकारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल साकारणार
शिवाजी विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल साकारणार

शिवाजी विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल साकारणार

sakal_logo
By

फोटो-03883
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंचा गुणगौरव समारंभ शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

03891
कोल्हापूर ः क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषक कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना दि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील.

विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल
---
कुलगुरू डॉ. शिर्के; न्यू कॉलेज सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेते
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः शिवाजी विद्यापीठात लवकरच अत्याधुनिक कुस्ती संकुल आणि सुसज्ज व स्वतंत्र क्रीडा वसतिगृह साकारण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे सांगितले. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि द्वितीय खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या गुणगौरव समारंभात (कलर ॲवॉर्ड) ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील या समारंभास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. सन २०२१-२२ मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरी बजावणारे महाविद्यालय म्हणून दि न्यू कॉलेजला क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषकाने गौरविण्यात आले. सर्वाधिक ५७८ गुण घेत दि न्यू कॉलेजने सलग सहाव्या वर्षी हा बहुमान पटकावला.
डॉ. शिर्के म्‍हणाले, ‘‘महाविद्यालयांतून हे खेळाडू जेव्हा पदव्युत्तर शिक्षणात येतात, तेव्हा त्यांचे क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष होते. मात्र, करिअर म्हणून आता क्रीडा क्षेत्राची निवड करण्यास पोषक वातावरण आहे. इनडोअर खेळांसाठी आधुनिक संकुल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे पाठविला आहे. राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अत्याधुनिक कुस्ती संकुल उभारण्यात येईल. त्याचा आणि स्वतंत्र क्रीडा वसतिगृहाचा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच त्यांच्या कामास प्रारंभ करण्यात येईल.’’ प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे खेळाडू विविध खेळांसह रग्बी, कयाकिंगसारख्या क्षेत्रांत यश मिळवताहेत, ही अभिमानाची बाब आहे.’’ प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, ‘‘करिअर करण्याच्या नादात खेळातून आनंद मिळविणे मात्र सोडू नका.’’
खेळाडूंसह संघव्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षकांना ब्लेझर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान देऊन गौरविण्यात आले. न्यू कॉलेजतर्फे नागेशकर चषक प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वीकारला. मयूर रोकडे, स्वाती शिंदे, स्वप्नाली वायदंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत केले. डॉ. दीपक डांगे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.

वर्षभरात १०२ पदकांची कमाई
विद्यापीठाच्या खेळाडूंनी वर्षभरात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांतील विविध क्रीडा प्रकारांत १०२ आणि खेलो इंडिया स्पर्धेत २२ पदके पटकावली. महिला खेळाडूंनी एकूण १३ प्रकारांत, तर पुरुषांनी १० प्रकारांमध्ये पदके मिळविली आहेत.