
इचलकरंजीच्या बसस्थानकाची बीओटी तत्वावर पुर्नबांधणी; आमदार प्रकाश आवाडे
03875
इचलकरंजी : श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाची आमदार प्रकाश आवाडे यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पाहणी केली.
इचलकरंजीच्या बसस्थानकाची
बीओटी तत्वावर पुर्नबांधणी
आमदार प्रकाश आवाडे; अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
इचलकरंजी, ता. २० : येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर पुर्नबांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमदार आवाडे यांच्यासमवेत बसस्थानक परिसराची पाहणी केली. त्यानंतर पुनर्बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली. या बसस्थानककाची व परिसराची दूरवस्था झाल्याने दुरुस्तीसाठी यापूर्वी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्याशिवाय आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. मध्यवर्ती बसस्थानक असुविधांचे आगर बनले आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे या बसस्थानकाचे ‘बीओटी’ तत्वावर पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय अभियंता मनोज लिंगरज, आगर व्यवस्थापक सागर पाटील यांनी इचलकरंजी बसस्थानकाला भेट देऊन चर्चा केली. या वेळी प्रकाश दत्तवाडे, आनंदा दोपारे, शेखर शहा, महादेव कांबळे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारिक, महावीर कुरुंदवाडे, अविनाश कांबळे उपस्थित होते.