कुलगुरूंनी उगरली छडी

कुलगुरूंनी उगरली छडी

कुलगुरूंनी केली कानउघाडणी

अधिविभागप्रमुखांची बैठक; कामचुकारपणा केल्यास कारवाईचा इशारा

कोल्हापूर, ता. १९ ः ‘वर्गात तासिका वेळेवर घेण्यात याव्यात, परीक्षाविषयक कामात टाळाटाळ करू नका, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह परीक्षांचे कामकाज नीट आणि वेळेत करा. त्यात कामचुकारपणा केल्यास कारवाई केली जाईल’, असा इशारा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्राध्यापकांना दिला. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात गुरूवारी सुमारे दोन तास चाललेल्या अधिविभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी या स्वरूपात एकप्रकारे शाब्दिक छडी उगारली.
विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये काही प्राध्यापक तासिका घेण्यात टाळाटाळ करत आहेत. वेळेत तासिका घेत नाहीत. परीक्षांचे पर्यवेक्षण, उत्तरपत्रिकांची तपासणी आदी कामकाजांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे दाखल झाल्या. त्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह परीक्षाविषयक कामकाजाबाबत अशा प्राध्यापकांना शिस्त निर्माण व्हावी, या उद्देशाने अधिविभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आदी उपस्थित होते.
वर्गात वेळेत तासिका घेणे हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ते काळजीपूर्वक करावे. परीक्षा कामकाज करणे ही देखील त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत दुर्लक्ष करू नये. वेळेत निकाल जाहीर करण्याची विद्यापीठाची परंपरा आहे. ती कायम राखण्यासाठी त्यांनी योगदान द्यावे. तासिका घेणे, परीक्षा कामकाजामध्ये चालढकल, हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. कामचुकारपणा करणाऱ्यांवर विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार आणि माझ्या अधिकारामध्ये कारवाई केली जाईल, असा इशारा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिला. परीक्षा कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश त्यांनी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. जाधव यांना दिला. वर्गात गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी लावण्याचे प्रकार करू नयेत. विद्यापीठातील शिस्तीबाबतच्या नियम, तरतुदींचे पालन करावे, अशी सूचना प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी केली.
....................................................

शैक्षणिक धोरण, प्रवेशाबाबत मार्गदर्शन

परीक्षाविषयक कामकाज, प्रवेश प्रक्रिया आणि जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आदींबाबत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अधिविभागप्रमुखांना मार्गदर्शन केले. विभागातील प्राध्यापकांच्या कामामध्ये शिस्त कायम राखली जाईल यादृष्टीने लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. दरम्यान, नियमित आणि शिस्तीचे पालन करून विभागांचे काम पाहणाऱ्या अधिविभागप्रमुखांनी कुलगुरूंच्या या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com