
इचल ः वेतन आयोग फरक वितरीत
पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार
सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता
जिल्ह्यातील पालिकांना मिळणार ८ कोटी ८२ लाखांचा निधी
इचलकरंजी, ता.१९ ः राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचलनालयाने राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश आज संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिला आहे. यामध्ये एकूण १५३ कोटी ५२ लाखांचा निधी वितरीत केला जाणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेसह अन्य पालिकांना ८ कोटी ८२ लाख ७० हजारांचा निधी मिळणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्या पोटी होणारी रक्कम सन २०१९-२० पासून दरवर्षी समान पाच हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार आतापर्यंत दोन हप्त्याची रक्कम वितरीत झाली आहे. तर तिसरा हप्ता कधी वितरीत होणार याकडे लक्ष लागले होते. याबाबत कर्मचारी संघटनांकडूनही शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. त्याला यश आले असून सध्या कार्यरत असणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तिसरा हप्त्याची रक्कम मिळणार आहे. इचलकरंजी महापालिकेसाठी ६ कोटी ३४ लाख रुपये मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पालिकांनाही याबाबतचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
....
पालिकेचे नाव * वितरित निधी
-----
गडहिंग्लज * ३६ लाख ३८ हजार
हुपरी * ४ लाख ७२ हजार
जयसिंगपूर * ६२ लाख ५६ हजार
कागल * ५३ लाख ११ हजार
मलकापूर * १९ लाख ६७ हजार
मुरगूड * २१ लाख ८ हजार
पन्हाळा * ११ लाख ५८ हजार
शिरोळ * ३ लाख २२ हजार
पेठवडगाव * ३४ लाख ८६ हजार
आजरा * ६० हजार