
शिवसेना पूर्वतयारी बैठक
04039
....
मुख्यमंत्री शिंदे यांची सभा यशस्वी करू
राजेश क्षीरसागर ः सभेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक
कोल्हापूर, ता. २० ः ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. या सभेसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिकच नव्हे तर सामान्य लोकांचीही उपस्थिती असेल. कार्यकर्त्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत’, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
‘शासन आपल्या दारी‘ या अभिनायाचा प्रारंभ यानिमित्ताने होणार असून २८ मे रोजी गांधी मैदानात सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पूर्वतयारी बैठकीत क्षीरसागर बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात बैठक झाली.
श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘शिवसेनेची स्थापना करताना शिवसेनाप्रमुखांनी नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना तत्काळ न्याय मिळावा, यासाठी शाखाप्रमुख, गटप्रमुख अशी बांधणी केली आहे. सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शिवदूतांच्या नेमणूका केल्या जाणार आहेत. एका ‘मिसकॉल'' वर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून वैद्यकीय मदत मिळणार आहे.’
खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याला गतिमान सरकार दिले असल्याचे सांगितले. विकासाचे आणि लोकहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवून सभा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली. जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे नचिकेत खरात, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, जयवंत हारुगले, महेंद्र घाटगे, बिंदू मोरे, प्रा.शिवाजी पाटील, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.