
प्रामाणिक वागण्यात सुख आहे
gad221.jpg
04210
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात संजय देशमुख यांच्या हस्ते वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रा. किसनराव कुराडे, डॉ. अनिल कुराडे, प्रा. एस. एम. कदम उपस्थित होते.
--------------------------
प्रामाणिक वागण्यात सुख आहे
न्यायाधीश संजय देशमुख; ‘शिवराज’मध्ये वार्षिक अंकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : वाईटाची संगत करू नका. चांगल्याशी नेहमी संगत करा. आयुष्यात त्याग करण्याचा प्रयत्न करा. सुखाच्या मागे धावून सुख मिळत नाही. सुख प्रामाणिक वागण्यात आहे. ते मिळविण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.
येथील शिवराज महाविद्यालयात शिवराज-२३ या वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. श्री. देशमुख म्हणाले, ‘सततच्या व्यायामातून शरीर सदृढ करणे आवश्यक आहे. सदृढ शरीरामुळे जगण्यात एकप्रकारची शक्ती येते व चैतन्य निर्माण होते. त्यातून चांगल्या कार्याला उर्जा मिळते. त्यादृष्टीने आपण सर्वांनी घडले पाहिजे. तरच ही उर्जा घेऊन आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपण सतत वाचन करणे गरजेचे आहे. जे वाचले ते मेंदूपर्यंत गेले पाहिजे. तरच आपण यशस्वीपणे भविष्य घडवू शकतो.’
उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल श्री. देशमुख यांचा सत्कार केला. महाविद्यालयास नॅकचे ‘ए’ ग्रेड मिळाल्याबद्दल शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचा सत्कार केला. उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, अॅड. पोवार आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनी आभार मानले.