
सत्यशोधक बुद्धिजीवीनी भूमिका घेऊन स्त्री मुक्तीचे कार्य करावे
04274
...
सत्यशोधक बुद्धिजीवींनी भूमिका
घेऊन स्त्री मुक्तीचे कार्य करावे
समाजशास्त्र परिषदेतील सूर; डॉ. रमेश जाधव, एन. डी. जत्राटकर यांच्यासह चौघांना जीवनगौरव पुरस्कार
कोल्हापूर, ता. २२ ः स्त्री- पुरूष समानता झाली, तरच भारत महासत्ता होण्याचे आपले स्वप्न साकारणार आहे. स्त्रियांना अधिकचे स्वातंत्र्य, हक्क मिळायला हवेत. सत्यशोधक बुद्धिजीवींनी एक भूमिका घेऊन स्त्री मुक्तीचे कार्य करणे आवश्यक आहे, असा सूर सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र परिषदेच्या १४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात व्यक्त झाला.
येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या व्ही. आर. शिंदे सभागृहातील या अधिवेशनाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. समाजशास्त्र विषयात अध्यापन, संशोधन क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या डॉ. रमेश जाधव, एन. डी. जत्राटकर, आर. बी. पाटील, एस. डी. अकोळे यांना समाजशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एस. एन. पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा परदेशी यांचे बीजभाषण झाले.
‘समाजातील सर्वच बुद्धिवंतानी स्त्री -पुरुष समानतेसाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. केवळ कागदावर समानता असून उपयोगाची नाही, तर वास्तवातील समानता असायला पाहिजे. जोपर्यंत ही समानता येत नाही. तोपर्यंत आपण केवळ भारत महासत्ता होण्याची स्वप्नच पाहत राहू’, असे प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले. ‘आम्ही लावलेल्या या परिषदेच्या रोपट्याचे आज बहरलेला वटवृक्ष झाल्याचे पाहून समाधान वाटत आहे. ज्यांनी विद्यापीठ पातळीवर समाजशास्त्र विषय मोठा करण्यामध्ये हातभार लावला. त्यांना ही परिषद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत असून ही मोठी गोष्ट असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
स्त्रियांच्या प्रश्नांवर आज खंबीरपणे भूमिका कोणी घेत नाही. मारहाण, घरगुती हिंसाचार आदी माध्यमातून स्त्रियांना बंदिस्त करून ठेवले आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारातून पहिल्यांदा स्त्रियांना या जोखडातून मुक्त करण्याची भूमिका घेतली. सत्यशोधक बुद्धिजीवींनी केवळ लिहून अथवा बोलून चालणार नाही, तर त्यांनी एक भूमिका घेऊन आपल्यापरीने स्त्री मुक्तीचे कार्य केले पाहिजे. राज्य, समाज आणि धोरणकर्त्यांनी स्त्रियांना अधिकचे स्वातंत्र्य, हक्क द्यावेत, असे आवाहन डॉ. परदेशी यांनी केले.
या कार्यक्रमात समाजशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा, पीएच.डी.प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
परिषदेचे समन्वयक डॉ. के.एम.देसाई यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी प्रास्ताविक केले. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संभाजी कांबळे यांनी आभार मानले.
...............
पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांकडून परिषदेला देणगी
प्रा. सकटे यांनी समाजशास्त्र परिषदेसाठी २५ हजार रूपयांची देणगी जाहीर केली. त्यावर जीवनगौरव पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ प्राध्यापकांनी प्रत्येकी दहा हजार रूपयांची देणगी दिली. दरम्यान, या अधिवेशनात ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि स्त्रिया’ या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी संशोधन पेपर सादर केले.