गॅस चेंबरवर कचरा पेटवणे धोक्याचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस चेंबरवर कचरा पेटवणे धोक्याचे
गॅस चेंबरवर कचरा पेटवणे धोक्याचे

गॅस चेंबरवर कचरा पेटवणे धोक्याचे

sakal_logo
By

ich225.jpg
04319
इचलकरंजी ः कोरोची मार्गावरील गॅस चेंबर असलेल्या ठिकाणी कचऱ्‍यास आग लावण्यात आली. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

गॅस चेंबरवर कचरा पेटवणे धोक्याचे
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज; प्रबोधनाची आवश्यकता
इचलकरंजी, ता. २२ ः शहरात नॅचरल (नैसर्गिक) गॅस पुरवठा करण्याऱ्‍या पाईपलाइनच्या व्हॉल्व्हला गळतीने आग लागल्यानंतर संबंधित गॅस कंपनी जागी झाली होती. शहरातील दुरवस्थेत असणाऱ्या चेंबरची तातडीने दुरुस्ती केली होती. कोरोचीहून शहरात नॅचरल गॅस पुरवठा करण्याऱ्‍या पाईपलाईनच्या चेंबरवर कचरा पेटवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यावेळी अनर्थ घडला नाही. मात्र, या दुर्घटनेवरून बोध घेणे अपेक्षित असताना नागरिकांचा बेफिकीरपणा शहरासाठी धोकादायक बनत आहे.
शहरात नॅचरल गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनचे जाळे विणले आहे. पाइपमधून पुरवठा होणाऱ्‍या गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित गॅस कंपनीने ५०० मीटरवर चेंबर तयार करून व्हॉल्व्ह बसवले आहेत. शहरात विविध चौकामधून सुमारे १५० हून अधिक व्हॉल्व्ह बसवले आहेत. शहरात येणाऱ्‍या गॅस पाईपलाईनमध्ये सुमारे एक किमीवर चेंबर तयार केली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी चेंबर असलेले परिसर हे कचरा टाकण्याचे केंद्र बनली आहेत. तेथे कचऱ्‍याचा साठा अधिक झाल्यास त्यास आग लावण्यात येते. या आगीपासून निर्माण होणाऱ्‍या धगीमुळे गॅस व्हॉल्व्हला गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना योग्य त्या सूचना करणे आवश्यक बनले आहे.
सहा मार्च रोजी शहरातील पंचवटी चित्रपटगृह परिसरातील लायकर यांच्या घरासमोर असलेल्या नॅचरल (नैसर्गिक) गॅस पाईपलाइन व्हॉल्व्हमधून अचानक गॅस गळती होऊन आग लागली होती. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारी असणाऱ्‍या झाडाने पेट घेतला. लगतच उभी केलेली दुचाकी जळून खाक झाली होती. गॅस पुरवठा करणाऱ्‍या पाईपलाइनला आग लागल्याची बातमी वाऱ्‍यासारखी शहरात पसरली. शहरातील प्रत्येक भागातून गॅस पाइपलाइन गेल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिक गॅस चेंबरपासून आवश्यक खबरदारी घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र गॅस चेंबर असणाऱ्‍या ठिकाणच्या कचऱ्‍यास आग लावण्यात आल्याने खबरदारीबाबत प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे दिसत आहे.
---------
गॅस कंपनी जिल्हाधिकाऱ्‍यांना भेटणार
ज्या भागातून गॅस पाईपलाईन गेली आहे. जेथे चेंबर काढली आहेत. तेथील ग्रामपंचायतींना पत्राद्वारे खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. तसेच चेंबरमध्ये आग पोहोचू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. गॅस चेंबर परिसरामध्ये कचरा टाकण्यात येऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्‍यांना भेटून मागणी करण्यात येणार असल्याचे संबंधित गॅस कंपनीकडून सांगण्यात आले.