
सीपीआर पदभरती
सीपीआरमधील पदभरती
तत्काळ करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २२ ः येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय (सीपीआर) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदभरती तत्काळ करावी, या मागणीचे निवेदन राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने पद भरतीसाठी मान्यता दिली आहे. कक्षसेवक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, क्ष-किरण परिचर, सहाय्यक स्वयंपाकी, मदतनीस, बाह्य रूगणसेवक, अपघात सेवक, रक्तपेढी परिचर, नाभिक या संवर्गातील पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. सरळ सेवा भरतीसाठी सातत्याने पाठपुरावाही केला आहे. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भरती प्रक्रिया करायची आहे. त्याबाबतची कार्यवाही तत्काळ व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, कृष्णा नाईक, गणेश आसगावकर, राजेश वालेकर आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, निवेदनानंतर तत्काळ प्रशासनासोबत बैठक घेण्याचे ठरले.