
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चोरीचा प्रयत्न
साने गुरूजी वसाहत येथील
बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न
कोल्हापूर, ता. २२ ः साने गुरूजी वसाहतीमधील एका राष्टीयीकृत बँकेमध्ये चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. सोमवारी (ता.२२) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे दिसून आले आहेत. याबाबतची फिर्याद अजयकुमार जयराम देशमुख (वय ३२, रा. क्रशर चौक, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागच्या बाजूच्या लोखंडी शटरची दोन्ही कुलुपे तोडली. त्यानंतर लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरटे बँकेत घुटमळले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. थोड्या वेळाने चोरटे बँकेतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. सकाळी बँकेचे कर्मचारी बँकेत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.