
पाऊस
शहरात गडगडाटासह
मुसळधार पावसाची हजेरी
कोल्हापूर, ता. २२ ः मागील आठवडाभरात प्रचंड उष्म्याने लाही-लाही झालेल्या कोल्हापूरकरांना सोमवारी रात्री उशिरा पडलेल्या पावसाने काहीसा गारव्याचा अनुभव दिला. जवळपास तासभर पडलेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
मागील काही दिवसांपासून वाढत्या पाऱ्यामुळे शहरवासीय हैराण झाले होते. दोन दिवसांपासून तर उष्णतेचा कहर झाला होता. आज रात्री नऊच्या सुमारास ढगांची गर्दी झाली आणि वारे वाहू लागले. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली, पण पाऊस काही पडला नव्हता. खबरदारी म्हणून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित केला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास थेंब पडायला सुरुवात झाली. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींनी रस्त्यावर पाणीच पाणी करून टाकले. अगदी दहा मिनिटांच्या अवधीतच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. जवळपास तासभराहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसाने हवेत एकदम गारवा निर्माण झाला. काही भागांत उशिरा पावसाला सुरुवात झाली.