
रुईतील नागरिकांचा इचलकरंजीत मोर्चा
ich231.jpg
04461
इचलकरंजी ः अतिक्रमण निष्कासित नोटीसा रद्द कराव्यात यासाठी राष्ट्रीय दलित महासंघाने मोर्चा काढून निदर्शने केली.
रुईतील नागरिकांचा इचलकरंजीत मोर्चा
अतिक्रमणाच्या नोटीसा रद्द करण्याची मागणी; अपर तहसिलदारांना निवेदन
इचलकरंजी, ता. २३ ः रुई (ता. हातकणंगले) येथे अतिक्रमण निष्कासित करण्याच्या बजावलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, गावठाण बेघरमधील जुने अतिक्रमण नियमित करावे, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रीय दलित महासंघातर्फे अप्पर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.
मागण्यांचे निवेदन अप्पर तहसिलदार शरद पाटील यांना दिले. यावेळी अप्पर तहसिलदार पाटील यांनी सर्वांची वैयक्तिक माहिती पूर्ण करून ती ३१ मे पर्यंत सादर करावी, असे आदेश तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना दिले. कोणत्याही प्रकारची माहिती न घेता रुई येथील तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी चुकीची यादी वरिष्ठ कार्यालयाला कळवली आहे. परिणामी, नागरिकांना अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. गट क्र. ५९७ हा गावठाण वाढ योजनेकडे हस्तांतरीत केला आहे. येथे सिमांकन करून १५७157प्लॉट पाडले आहेत. त्यातील काही प्लॉट राखीव योजनेस ठेवले आहेत. प्लॉट पाडण्यापूर्वी येथे ३९ घरे वजा झोपड्या होत्या. त्यांचे प्लॉट यादीमध्ये बेघर मंजूर झाले आहे. तेथे काहिंनी आपली पक्की घरे बांधली आहेत. त्यामधील काहींना पंचायत समितीमार्फत घर योजनेचाही लाभ मिळाला आहे. त्यावेळी प्लॉटच्या जागा नियमानुकुल होवून सनद मिळेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे तो प्रस्ताव तयार करून मंडल अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय कार्यालयाकडे पाठवला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने जुनी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतचा आदेश दिला आहे. मात्र ग्रामपंचायतीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे. मोर्चात अध्यक्ष नंदकुमार साठे, कृष्णा जगताप, खलिफा बेग, रियाज नदाफ, दिलावर नायकवडे, एकनाथ चांदणे, अनुसया कमलाकर, इंदुबाई सुतार, दिलशाद मुल्ला आदींनी सहभाग घेतला होता.