जोतिबा प्राधिकरण

जोतिबा प्राधिकरण

फाईल फोटो
...


जोतिबा प्राधिकरणासाठी
दहा दिवसांत प्रस्ताव करा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

कोल्हापूर, ता. २३ : ‘दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह २८ गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन प्रस्तावित आहे. यासाठी, जोतिबा परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील गावांतील प्रस्ताव दहा दिवसांत जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा’, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जोतिबा प्राधिकरणाचा प्रस्ताव २५ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर देण्याबाबत सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. काही तांत्रिक बाबींमुळे हा अहवाल तयार झालेला नाही. प्राधिकरणासाठी आमदार विनय कोरे आग्रही आहेत. त्यामुळे, जोतिबा मंदिरासह नजिकच्या २८ गावांचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. भविष्यात या प्राधिकरणाबाबत नेमका आराखडा कसा असावा, याबद्दल आज बैठक घेतली. जोतिबा मंदिरात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आठ ते दहा लाख भाविक येतात. अशा वेळेला या गावांचा विकास झाला पाहिजे. त्यांचे नियोजन करण्याच्या आज सूचना दिल्या.
श्री. रेखावार म्हणाले, ‘प्राधिकरणासाठी शासनाने सुचवलेल्या सर्व बाबींचा विचार करावा. प्राधिकरणासाठी आवश्‍यक असणाऱ्या विकासकामांचा आराखडा तयार केला पाहिजे. यानंतर हा अहवाल शासनाला मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्याआधी या आराखड्यात प्रस्तावित गावांमध्ये कोणकोणती विकासकामे करु शकतो. ऐतिहासिक वास्तू, बौध्द लेणी, पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल या सर्वांचा प्रस्ताव तयार करावा.’ यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सचिव विजय पवार, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.

.....

या गावांचा प्राधिकरणात होणार समावेश

वाडी रत्नागिरी, कुशिरे तर्फ ठाणे, कासारवाडी, शिये, वडणगे, जाखले, बहिरेवाडी, भुयेवाडी, भुये, जाफळे, केखले, पोखले, पोहाळे तर्फ आळते, माले, गिरोली, दाणेवाडी यासह २८ गावांचा विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com