
शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आजपासून
विद्यापीठाच्या उन्हाळी
सत्रातील परीक्षा आजपासून
विविध अभ्यासक्रमांचा समावेश; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील दोन लाख विद्यार्थी
कोल्हापूर, ता. २४ ः शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांचा प्रारंभ उद्या, गुरुवारपासून होणार आहे. या सत्रात एकूण ६०० परीक्षा होणार असून त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जुलैपर्यंत या परीक्षा होणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उन्हाळी सत्रातील परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, विद्यार्थी, पालकांनी या परीक्षा लवकर घेण्याची मागणी केली. त्याचा विचार करून विद्यापीठाने २५ मे पासून घेण्याचे ठरविले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बी. ए., बी. कॉम. भाग तीन अभ्यासक्रमांच्या पाच आणि सहा सत्रातील नियमित, पुर्नपरीक्षार्थीं विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यासाठी ३० हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ऑफलाईन वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा होणार आहेत. पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय आणि अधिविभागस्तरावर होणार आहेत. महाविद्यालयस्तरावरील परीक्षा १५ ते २५ जून, तर विद्यापीठातील अधिविभागांच्या पातळीवर १ ते १५ जून या कालावधीत परीक्षा होतील. दरम्यान, बीएड सेमिस्टर तीन आणि चार या परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. आतापर्यंत एकूण ५५३ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
...
महाविद्यालय पातळीवर
प्रथम वर्षाच्या परीक्षा
पदवीस्तरावरील परीक्षा (प्रथम आणि द्वितीय वर्ष-सत्र १,२, ३ आणि ४) महाविद्यालय पातळीवर गुरूवारपासून होणार आहेत. त्यात बी. ए., बी. कॉम., बीसीए., आदी पारंपरिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अशी सर्व परीक्षाविषयक कामाची जबाबदारी महाविद्यालयांवर आहे.