
विद्यापीठाच्या वार्षिक अहवालावर ‘सिनेट’ तापणार
शिवाजी विद्यापीठाची
आज विशेष अधिसभा
वार्षिक अहवालावर सभा वादळी होण्याची शक्यता
कोल्हापूर, ता. २४ ः शिवाजी विद्यापीठाची विशेष अधिसभा (सिनेट) गुरूवारी होणार आहे. राजर्षी शाहू सभागृहात दुपारी १२ वाजता या सभेला सुरूवात होणार आहे. विद्यापीठाचा वार्षिक अहवालातील चुका आणि बृहत् आराखड्यातील बिंदू प्रस्तावाच्या मुद्दांवरून या सभेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरवर्षी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल मार्चमधील सिनेटमध्ये सादर केला जातो. त्याला या सभेत मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळात सादर करण्यात येतो. मात्र, यावर्षी वार्षिक अहवाल तयार करण्यास विलंब झाला. या अहवालामध्ये काही गंभीर चुका आहेत. त्यावर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी उपसमिती नेमली आहे. अहवालाची छपाई करणाऱ्या मुद्रणालय विभागावर आक्षेप घेतला जात आहे. त्यावर सिनेट सदस्यांकडून विविध प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षांचा बृहत् आराखडा विद्यापीठाकडून तयार करण्यात येत आहे. त्यात नवीन महाविद्यालयांचे बिंदू प्रस्तावित केले आहेत. मात्र, दोन महाविद्यालयांचे बिंदू रद्द करण्यात आले आहेत. त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, १० मार्च रोजी विद्यापीठाची सिनेट झाली होती. त्यामध्ये ५३८ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक (बजेट) मंजूर झाले होते.