
धार
04954
... आणि त्यांच्या लेखणीला आली ‘धार’
कांडरवाडीतील पाच तरुण पोलिस दलात; खासगी क्लासशिवाय घातली यशाला गवसणी
रंगराव हिर्डेकर ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः ता. २५ ः घोंगडं भिजवणारा पाऊस... कोण आजारी पडलं तर खाटलं करून १५ ते २० किलोमीटर चिखल तुडवत बाजार भोगाव गाठायचं. लाकूडतोड आणि रानमेवा विकून जमलेल्या पुंजीतून मिरगालाच पावसाळ्यात लागणारा बाजारहाट करून ठेवायचा... साधारण ८० च्या दशकांपर्यंत पश्चिम पन्हाळ्यातील जांभळी खोऱ्यातील गावांची स्थिती. कालपरत्वे दळणवळणाची साधने वाढताच गावे जवळ आली.. विकासही होऊ लागला. पन्हाळा तालुक्यातील अवघ्या दोन अडीचशे लोकवस्तीच्या कांडरवाडीतील तरुणाईने कोयता सोडून लेखणी हातात धरली आणि ध्येयाला गवसणी घातली.
अवघ्या दोन अडीचशे लोकवस्तीची काळजवडे पैकी कांडरवाडी. शेतकरी, भूमिहीन अन् शेतमजूर कुटुंब इथं गुण्यागोविंदानं राहतात. पारंपरिक शेती अन् मजुरी करण्यातच आजवरच्या पिढ्यांनी ध्यन्यता मानली. सरकारी नोकरी हे केवळ स्वप्नच वाटत होतं. मात्र, अमर विष्णू कांडर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सिंधुदुर्ग पोलिसात भरती झाला. अमरच्या यशानं तरुणाईचा आत्मविश्वास दुणावला. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. गोठ्यात अभ्यास करून उत्तम लक्ष्मण कांडर मंत्रालय लिपिक झाला. पाठोपाठ शहाजी कृष्णा कांडर यांनेही यश मिळविले.
त्यांचा आदर्श घेत प्रकाश हिंदूराव कांबळे कोल्हापूर पोलिस दलात, सागर विष्णू पाटील केंद्रीय राखीव पोलिस दलात तर दीपक कोंडिबा पाटील व संदीप महादेव पाटील लष्करात भरती झाला. ना क्लास ना कोचिंगचा हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा कांडरवाडी पॕटर्नच तयार झाला आहे. कांडरवाडीतील सामाजिक सभागृहात ते अभ्यास करतात.
२०१६ पासून पोलिस भरतीसाठी आणखी काही तरुण प्रयत्न करत होते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत पाच जणांनी बाजी मारली आहे. बाबू महिपती पाटील, बाबासो नाथा पाटील, धनाजी शामराव कांडर, संभाजी नानू कांडर व विजय सत्तू सापते, पिसात्री येथील तानाजी बाळू पाटील यांची मुंबई अन् सिंधुदुर्ग पोलिस दलात निवड झाली आहे. कोणत्याही ॲकॕडमीशिवाय तरुणांनी हे यश मिळविले आहे. एकाच वेळी पाच जणांची निवड झाल्याने कांडरवाडी गुलालात न्हाऊन निघाली.
चौकट
एकीची भावना
गावचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अन् प्रतिष्ठितांचं बळही त्यांना मिळत आहे. एकमेकाला मार्गदर्शन अन् मदत करण्याची एक वेगळी भावना कांडरवाडीत पाहायला मिळाली.
कोट
खासगी क्लास न लावता स्वतःच अभ्यास करून हे यश मिळविले. स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेले उत्तम कांडर आणि शहाजी कांडर यांचा आदर्श घेत गावातील सामाजिक सभागृहात सर्वांनी मिळून अभ्यास केला. २०१६ पासून आम्ही सर्व जण तयारी करीत होतो.
- बाबू महिपती पाटील