
उन्हाळी शिबीरात व्यायाम, शिस्तीचे धडे
उन्हाळी शिबीरात व्यायाम, शिस्तीचे धडे
आजऱ्यात आय बिलीव्ही फौंडेशनचा उपक्रम; पालक व मुलांतून प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः आजऱ्यात झालेल्या उन्हाळी शिबिरात मुलांना व्यायाम व शिस्तीचे धडे दिले. आयुष्यात संस्कार, विनयशीलता व प्रामाणिकता कशी जपावी याबाबतही मार्गदर्शन केले. आय बिलीव्ही स्पोर्टस फौंडेशन कोल्हापूर या संस्थेने राबवलेल्या उपक्रमाला पालक व मुलांतून प्रतिसाद लाभला. विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांनी योगासह कराटेचे प्रशिक्षण दिले.
फौंडेशनमार्फत कुंभार गल्लीतील संत गोरा कुंभार सभागृहात पाच दिवसांचे शिबीर झाले. संस्थेच्या प्रतिनिधी वर्षा पाटील यांनी शिबिराबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ‘मुलांना मोबाईलपासून लांब ठेवले पाहीजे. त्यांना संस्कार, व्यायाम व शिस्तीची सवय लागणे गरजेचे आहे. तसेच मुलांच्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू पाडणे. त्यांच्या अंतर्मनातील शोध घेणे आवश्यक आहे. त्यांच्यात स्टेज डेरिंग वाढवणे हा शिबिराचा मुख्य हेतू आहे. मुलांना व महिलांना लाठीकाठी, डान्स, बॉक्सिंग, कुंग फु, वुशु, कराटे, नानचाकू, ड्रामा, योगा शिकवले. शिबिरात अभिनेता अमोल देसाई व जेडी अकॅडमीचे जावेद यांनी मार्गदर्शन केले. आय बिलीव्ह स्पोर्ट्स फौंडेशनचे उमेश चौगुले, अतुल साळोखे, कौशिक गावडे, श्वेता समुद्रे, वैभवी माने, नागराज रेड्डीयर, सुशांत कारंडे, शिवराज माने, प्रतीक्षा लोखंडे, प्रियल माने यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्यातील कौशल्यांना चालना दिली.