
फुटबॉल
अटल चषक फुटबॉल स्पर्धा
05021
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्या सामन्यातील क्षण ( मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
‘बालगोपाल’चा ‘सोल्जर्स’वर विजय
६ विरुध्द शुन्य गोलनी मात; पुढील फेरीत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम संघाने सोल्जर्स ग्रुपवर ६ : ० गोलनी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सीनियर फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना बालगोपाल तालीम विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यात खेळवला गेला. याच वर्षी सीनियर झालेला संघ सोल्जर ग्रुप याही स्पर्धेत काहीसा दबावाखालीच खेळत होता. पहिला अर्धा तास सामन्यात दोन्ही संघाकडून फारशा आक्रमक चढाया झाल्याच नाहीत.
कंटाळवाणा होत असलेला सामन्यात ३६ व्या मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटील याने मैदानी गोल करत संघाला एक गोलची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यामध्ये काहीशी रंगत येताना दिसली. ३९ मिनिटाला बालगोपालचा परदेशी खेळाडू जिबेलो यांने दुसरा गोल नोंदविला. सामना मध्यंतरापर्यंत २ :० गोलस्कोरमध्ये होता. मध्यंतरानंतर दोन्ही संघाकडून चढाईचे प्रयत्न झाले. ४६ मिनिटाला बालगोपालचा अभिनव साळुंखे याने मिळालेल्या पासवर हेडद्वारे सहजपणे तिसरा गोल केला. तीन गोलची आघाडी मिळवल्यानंतर बालगोपालने शांतपणे खेळण्यास सुरवात केली. ५८ मिनिटाला जिबेलो याने वैयक्तिक दुसरा मैदानी गोल केला आणि संघाची आघाडी ४ : ० अशी झाली. यानंतर चेंडू सोल्जरच्या क्षेत्रामध्येच फिरत राहिला. याचवेळी ६१ व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर कीकचा फायदा घेत जिबेलो याने हेडद्वारे चेंडू जाळ्यात ढकलला आणि संघाची आघाडी पाचवर पोचवली. ७६ व्या मिनिटाला सोल्जरच्या डीमध्ये झालेल्या गोंधळाचा फायदा घेत अक्षय सरनाईक यांने सहावा गोल केला आणि निर्णायक ६:० ची आघाडी घेतली. निर्धारित वेळेत बालगोपालने हा सामना ६ : ० जिंकला.
सामन्यामध्ये बालगोपालच्या रोहित कुरणे, ऋतूराज पाटील, आशिष कुरणे, दिग्विजय वाडेकर या खेळाडूंनी चांगला खेळ केला. तर सोल्जरच्या स्वप्निल पाटील, निलेश साळुंखे, सिद्धेश देसाई आणि प्रथमेश रावण यांनी आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. सामनावीर म्हणून बालगोपालच्या जीबेलो याचा सन्मान करण्यात आला. तर लढवय्या खेळाडू म्हणून सोल्जरच्या स्वप्निल पाटील याला गौरवण्यात आले.
------------
आजचा सामना
संयुक्त जुना बुधवार तालीम विरुद्ध सम्राट नगर स्पोर्ट्स
दुपारी : चार वाजता