दसरा नव्हे...फास्टफूड चौक !

दसरा नव्हे...फास्टफूड चौक !

दसरा नव्हे...फास्टफूड चौक !
खाद्यपदार्थ वाहनांचा वेढा; पार्कींगमध्ये अतिक्रमण, पालिका-पोलिसांचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : शहरातील सर्वाधिक गर्दीच्या दसरा चौकाला खाद्यपदार्थांच्या वाहनांसह फेरीवाल्यांचा वेढा वाढत आहे. गर्दीचा फायदा उठवण्यासाठी याच जागेवर सर्वांच्या उड्या पडत आहेत. पार्किंगच्या जागेवरच अशा वाहनांचे अतिक्रमण होत असल्याने वाहनधारकांत नाराजी आहे. दरम्यान, या भागातील वाहतूक कोंडीने आगारातून एसटीला ये-जा करण्यासही कसरत करावी लागत आहे.
मुळातच या चौकात वाहतुकीचा बिकट प्रश्न आहे. नागरिकांना तर गर्दीच्या ठिकाणी जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून चालावे लागते. शिवाजी महाराज पुतळा ते वीरशैव बँक चौक या मुख्य मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केल्याने अनेकदा कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे पार्कींगचा प्रश्न गंभीर बनला आहे. दसरा चौकालगतच बसस्थानक, प्रांताधिकारी व नगरपालिका कार्यालय आहे. यामुळे या परिसरात नेहमीच गर्दी असते. ही अधिकची वर्दळ लक्षात घेऊन फळ विक्रेत्यांना सुचना देऊनही जैसे थे परिस्थिती आहे. आता सायंकाळी यात खाद्यपदार्थांच्या वाहनांची भर पडत आहे. पुर्वी केवळ एक-दोन आईस्क्रीम विक्रेत्यांचे गाडे लागायचे. यात आता फास्टफूडच्या अर्ध्या डझनहून अधिक गाड्या लागत आहेत. दसरा चौकातील कारंज्या लगतचा परिसर चारचाकी, दुचाकी वाहन पार्किंगसाठी वापरला जातो. पण, याच जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्याने वाहनधारक त्याच्यांभोवतीच जागा मिळेल तिथे पार्किंग करीत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
--------------
वाहतुकीची कोंडी
शहरात एकही वाहनतळ नाही. यामुळे अनेक वाहने रस्त्यावर जागा मिळेल तेथे थांबतात. दसरा चौकात थोडी रिकामी जागा आहे. तेथेच खाद्यपदार्थांच्या गाड्या लागत असल्याने आजरा, चंडगड मार्गावर धावणाऱ्‍या वाहनांची कोंडी होत आहे. पोलिस आणि पालिकेने समन्वयातून या खाद्यपदार्थांच्या वाहनांची पर्यायी व्यवस्था करुन ही जागा मोकळी ठेवावी, अशी मागणी आहे.
--------------
दसरा चौकातील जागेत पार्कींगसाठी पट्टे मारले आहेत. खाद्यपदार्थांची वाहने लावू नयेत अशा सूचनाही दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसेल तर तातडीने कारवाईच्या सूचना संबंधित विभागाला देऊ.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी
------------------------------------
शहरात अधिकृत वाहन थांबा नसल्याने वाहनधारकांची कुंचबणा होते. दसरा चौकातील जागा वाहने वळवून घेण्यासाठी उपयोगी पडते. पण, सायंकाळी तेथील गर्दीमुळे वाहनधारकांची अडचण होत आहे.
- महेश गाडवी, वाहनधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com