
अंबाबाई मंदिर गर्दी
05211
अंबाबाई मंदिरात
भाविकांची हाऊसफुल्ल गर्दी
पर्यटन हंगामाची सांगता, दिवसभर दर्शनमंडप राहिला फुल्ल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः पर्यटन हंगाम सांगतेकडे निघाला असताना आजपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. चौथा शनिवार व रविवारच्या पार्श्वभूमीवर आणखी दोन दिवस ही गर्दी कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने खबरदारीच्या उपायांवर भर दिला आहे.
आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली. बघता बघता दर्शन मंडपाबाहेर जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे रांग लागली. दुपारी बारानंतर मात्र दर्शन मंडप दिवसभर फुल्ल राहिला. भाविकांनी सहकुटुंब दर्शनावर भर दिला असून, पार्किंगही फुल्ल राहिले. मंदिराच्या चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली. मात्र, वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
सोमवार (ता.२९) पासून राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवल्याने परगावचे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. अंबाबाई मंदिराबरोबरच रंकाळा, नवीन राजवाडा, कणेरी मठ, जोतिबा आदी ठिकाणीही सलग तीन दिवस गर्दी राहणार आहे.