
इरिगेशन फेडरेशन
शेतीपंपावरील वीज भारनियमन रद्द करा
इरिगेशन फेडरेशनः अन्यथा महावितरणच्या कोल्हापूर, सांगलीतील कार्यालयांना टाळे ठोकू
कोल्हापूर, ता. २७ ः राज्यातील वीज टंचाईचे कारण पुढे करीत महावितरण कंपनीने अचानकपणे केवळ शेतीपंपावर सुरू केलेले वीज भारनियमन त्वरित रद्द करावे अन्यथा महावितरणच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन करू, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने निवेदनाव्दारे दिला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना वीज अभ्यासक प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
निवेदनातील म्हटले आहे, गेल्या काही दिवसात राज्यभरात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे विजेची टंचाई होत आहे. अशा स्थितीत महावितरण कंपनीने अचानकपणे सहकारी पाणी पुरवठा संस्था, कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज भारनियमन सुरू केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे असताना महावितरणकडून कृषिपंपासाठी वरचेवर वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे फेर मिटत नाहीत. उपसा कालावधीत जर वीज पुरवठा खंडीत केला तर त्याचदिवशी जेवढा वेळ वीज जाईल तेवढा कालावधी त्याच दिवशी वाढवून देणे गरजेचे आहे, मात्र तसे घडत नाही. कृषीपंपासाठी दिवसा व रात्री आठ तास वीज मिळत आहे, तीही कमी दाबाने व खंडीत वीज असल्यामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी देता येत नाही.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याच्या काळात कृषीपंपाना किमान १२ तास वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या उलट महावितरण कंपनीकडून फोर्स भारनियमन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वास्तविक विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज बिल वसुलीनुसार त्या त्या प्रमाणात भारनियमन करणे बंधनकारक आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची वीज बिलाची वसुली राज्यात सर्वात अधिक आहे. तरीही येथे भारनियमन होत आहे ही बाब गंभीर आहे. वीज टंचाईचे संकट आहे ही बाब मान्य आहे. मात्र, त्यासाठी केवळ शेतकऱ्यांना वेठीस न धरता सर्व घटकांवर समान भारनियमन करावे. त्यासाठी महावितरण कंपनीने समाधारकारक तोडगा काढावा.
शिष्टमंडळात सुभाष शहापुरे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, एस. ए. कुलकर्णी, सचिन जमदाडे, जावेद मोमीन, गुणाजी जाधव, किरण पाटील, दादासो पाटील, महादेव सुतार, वाडकर आबा, आत्माराम पाटील व मारुती पाटील यांचा समावेश होता.