दुचाकी चोरी बिग स्टोरी

दुचाकी चोरी बिग स्टोरी

फाईल फोटो
...

बिग स्टोरी
... लोगो
....

दुचाकी चोरायला सोपी, विक्रीला स्वस्त

साडेतीन वर्षांत एक हजार ६७९ चोऱ्या; सापडल्या फक्त ६३२

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये सहज म्हणून पाहिल्यास काही दुचाकी विनानंबर प्लेटच्या दिसतील. या दुचाकी चोरीच्या असतात. पण, काही लोक बिनधास्तपणे या दुचाकी वापरतात. कारण त्या कमी किमतीत मिळतात. पण, यामुळेच शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. सरासरी रोज एक दुचाकी चोरीला जाण्याची घटना घडते. त्यामुळे पोलिस प्रशासनासह सर्वांनीच खबरदारी घेतली, तर दुचाकी चोऱ्यांना अटकाव करता येईल.
दुचाकी चोरींचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे दुचाकी चोरायला सोपी असते आणि विक्रीसाठी त्याचा ग्राहकही ठरलेला असतो. पण, ज्याने कष्टाने दुचाकी घेतलेली असते, त्याला मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागतो. दुचाकी चोरणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी एक मोठी साखळी तयार असते. संघटितपणे हा व्यवसाय चालतो. परजिल्ह्यांतील चोरटे कोल्हापुरात येऊन दुचाकी चोरीचा उद्योग करतात. चोरलेल्या दुचाकी मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
-----------

वर्ष चोरीला गेलेल्या दुचाकी मिळालेल्या दुचाकी
२०२१ ७२० २७२
२०२२ ८६७ ३४५
२०२३ ९२ १५
-----------

बाजारपेठा, मध्यवर्ती बसस्थानक लक्ष्य
शहरातील गजबजलेल्या बाजारपेठा, मध्यवर्ती बसस्थानक, मध्यवर्ती चौक, रंकाळा, जोतिबा अशी पर्यटन- धार्मिक स्थळे अशा ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना अधिक होतात. येथे वर्दळ असूनही सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. त्यामुळे चोरट्यांना चोरी करणे शक्य होते. अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे. पार्किंगची व्यवस्था वाढविल्यास नागरिकांना इतरत्र वाहने लावावी लागणार नाहीत.
-----------

ठराविक दुचाकीच लक्ष्य
काही दुचाकी चोरण्यासाठी सोप्या असतात. कारण या दुचाकींचे हँडल विशिष्ट पद्धतीत फिरवले की त्यांचे हँडेल लॉक तुटते. त्यानंतर काही वायर एकमेकांना जोडल्या की विनाकिल्लीची गाडी सुरू होते. त्यामुळे अशाच दुचाकी चोरट्यांचे लक्ष्य असते.
-----

ग्रामीण भाग ही विक्रीची हक्काची बाजारपेठ
चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी चोरटे ग्रामीण भागाची निवड करतात. गावातल्या गावात फिरण्यासाठी, शेतातून वैरण आणण्यासाठी किंवा अन्य घरगुती कामासाठी चोरीच्या दुचाकी स्वस्तात विकत घेणारे लोक आहेत. अवघ्या २० ते २५ हजारांत ही दुचाकी मिळते. ॲडव्हान्स म्हणून एवढे पैसे घेतात. उर्वरित रक्कम कागदपत्रे दिल्यावर देण्याचे ठरते. पण, २० ते २५ हजार रुपये घेऊन चोरटे पोबारा करतात. ग्राहकालाही ही दुचाकी कमी किमतीत मिळते.
--------

स्पेअर पार्टसाठी उपयोग
चोरट्यांकडून दुचाकी घेणारे ठराविक स्क्रॅप व्यावसायिक आहेत. ते या दुचाकीतील चांगले स्पेअर पार्ट काढून घेतात व उरलेला सांगाडा किलोवर विकतात. स्पेअर पार्ट गॅरेजवाल्यांना कमी किमतीत विकतात. दुचाकी चोरून त्यांची विल्हेवाट लावणारी मोठी साखळी कार्यरत आहे.
-------

परजिल्ह्यांतील चोरटे जास्त
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्यांमध्ये सांगली, बेळगाव, निपाणी, सोलापूर येथील चोरट्यांची संख्या अधिक आहे. स्थानिक चोरटेही यात आहेत. सराईत चोरटे शिक्षा भोगून आल्यावरही पुन्हा दुचाकी चोरीचीच कामे करतात. एका दुचाकीमागे त्यांना किमान ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्यासाठी अशा प्रकारे चोरी केली जाते.
-------
कोट

दुचाकी चोरीचे प्रमाण कमी करायचे असेल, तर पोलिसांबरोबरच नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जुनी दुचाकी विकत घेताना पूर्ण कागदपत्रे ताब्यात घेऊन मगच व्यवहार करावा. चोरीची दुचाकी विकत घेणे हाही गुन्हा आहे. बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्यांचे फुटेज ठेवावे, असे झाल्यास चोरलेल्या दुचाकी विकणे अवघड होईल.
- तानाजी सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com