
इचल ः आवाडे टिका
ब्रेक टेस्ट ट्रॅक मंजुरीवरुन
आवाडे यांच्याकडून दिशाभूल
प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांची टीका
इचलकरंजी, ता. २७ ः ब्रेक टेस्ट ट्रॅक मंजुरी देण्याच्या विषयावरुन आमदार प्रकाश आवाडे हे नागरिक व वाहनधारकांची दिशाभूल करीत आहेत. आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांनी केलेली टीका ही व्देषभावनेतून केली आहे, असे पत्रक प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांतून वाहनधारकांची सोय होण्यासाठी केएटीपी येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक बसविण्यात आला आहे. पण त्याला तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने व तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंजुरी दिली नाही, अशी टीका आमदार आवाडे यांनी केली होती. त्याबाबत बावचकर यांनी आज पत्रकाव्दारे उत्तर दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात संबंधित ब्रेक टेस्ट ट्रॅकची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तसे पत्र प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी दिले होते. पूर्वीच्याच अटींचा व त्रुटींचा उल्लेख करीत विद्यमान शासनाने सशर्त मंजुरी दिली आहे. असे असताना आमदार आवाडे हे वाहनधारक व नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात महाविकास आघाडीवर टीका करण्याशिवाय कोणतेही भरीव काम केलेले नाही. केवळ व्देषभावनेतून व जनतेची खोटी सहानुभूती मिळविण्याचे एवढेच काय ते त्यांचे काम सुरु आहे.