
नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी
05429
कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूलचा स्नेहमेळावा शनिवारी झाला. या वेळी यशवंतराव थोरात यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. या वेळी बाळ पाटणकर उपस्थित होते.
शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार
यशवंतराव थोरात; नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. विद्यार्थ्यांच्या गुण, अवगुणाची पारख करून शिक्षक विद्यार्थी घडवतो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या नावाने काही चांगल्या संस्था ओळखल्या जातात,’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी केले. रंकाळावेस येथील श्री. बी. एन. पाटणकर ट्रस्ट संचालित नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे विश्वस्त आर. ए. ऊर्फ बाळ पाटणकर उपस्थित होते.
ज्या मातृसंस्थेने विद्यार्थ्यांना घडविले, त्या मातृसंस्थेशी असणारे ऋणानुबंध अधिक वृध्दिंगत करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग व सर्व पदाधिकाऱ्यांनी या माजी विद्यार्थी महास्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी थोरात म्हणाले, ‘‘लहानपणापासून उच्च पदापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षक होण्याची इच्छा होती. कारण मी जीवनामध्ये शिक्षकांमुळेच घडलो. मी का जगतो, कशासाठी जगतो, माझे ध्येय काय, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवन समजत नाही. यश कसे मिळवायचे, हे प्रत्येकाने ठरवायचे असते. आपल्या कार्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करून एकाच्या जीवनाचे जरी परिवर्तन झाले तरी आपल्या जीवनाचे सार्थक होईल. विद्यार्थ्यांनी अहंकार दूर ठेवल्यास यश नक्कीच मिळते.’’ संस्थेचे चेअरमन आर. ए. ऊर्फ बाळ पाटणकर, विश्वस्त डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव एन. एल. ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग, धनाजी जाधव, चंदू ओसवाल, सूर्यकांत सोनुले, रवी बावडेकर, मंगेश गुरव, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एच. आर. सत्रे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी जाधव यांनी आभार मानले.