अनाथ मुलांना हवाय सकस आहार

अनाथ मुलांना हवाय सकस आहार

अनाथ मुलांना हवाय सकस आहार
एचआयव्ही बाधित मुले; होप फाउंडेशनने दिली माणुसकीची हाक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : एचआयव्ही बाधित अनाथ मुलांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आठ वर्षांपासून अखंडित सकस आहार पुरवणाऱ्‍या येथील होप फाउंडेशनने सध्या दानशूर व्यक्तींना माणुसकीची हाक दिली आहे.
समाजातून मदतीचे हात कमी पडत असल्याने या अनाथ मुलांना कडधान्य पुरवणे अशक्य होत आहे. केवळ अपुऱ्या निधीअभावी या सेवेत खंड पडल्याने दानशूर गडहिंग्लजकरांना मदतीची हाक देण्याची वेळ आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात १६० हून अधिक एचआयव्ही बाधित अनाथ मुले आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. ती वाढवण्यासाठी त्यांना सकस आहार देणे महत्त्वाचे आहे. काही मुलांचा सांभाळ करणाऱ्‍या आजी-आजोबांना या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अशक्य असते. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही नकारात्मक असतो. म्हणून काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीला धावून जात आहेत. येथील नचिकेत भद्रापूर व सहकाऱ्‍यांची होप फाउंडेशन ही संस्था त्यांपैकीच एक आहे.
संस्था गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरांतील २० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना हरभरा, मूग, मटकी, गूळ, शेंगदाणे, नाचणी, सोयावडी असा सकस आहार पुरवण्याचे काम करते. नचिकेत शिक्षणासाठी असताना नेदरलँडमधून आणि स्थानिक दानशूरांनी दिलेल्या मदतीतून आठ वर्षे अखंडित घरपोच सकस आहार दिला आहे. आहार देण्यातील सातत्यामुळे अनेक मुलांची प्रकृतीही सुधारली आहे. महिनाभरापासून मात्र सकस आहार उपलब्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. प्रत्येक मुलाला महिन्याचा सकस आहार द्यावयाचा झाल्यास १२०० रुपयांचा खर्च आहे. अपुऱ्‍या निधीमुळे कडधान्यांची खरेदी मुश्किल होत आहे. परिणामी फाउंडेशनकडून ५०० ते ६०० रुपयांचाच सकस आहार दिला जातोय. मदतीत कुठेतरी कमी पडत असल्याची खंत फाउंडेशनच्या सहकाऱ्‍यांत आहे. त्यामुळे आता परिपूर्ण सकस आहार देण्यासाठी गरज आहे ती दानशुरांच्या मदतीची. त्यासाठीच फाउंडेशनने माणुसकीची हाक दिली आहे.
------------
त्या मुलांच्या मानसिकतेला वेदना
एचआयव्हीचा आजार म्हटला की, घाबरून घरातून अशा मुलांना बाहेर काढल्याची उदाहरणे आहेत. कोणी भिक मागून पोटाची खळगी भरत आहे, तर कोणी शेतवडीत झोपडी बांधून राहत आहे. या वागणुकीमुळे अशा मुलांच्या मानसिकतेला वेदना होत आहेत. होपकडून काहींना संजय गांधी पेन्शनही मंजूर करून दिली आहे. आता मात्र सकस आहाराची गरज असून त्यासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन भद्रापूर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com