बाजारात ठेकेदाराची ‘सक्त वसूली’

बाजारात ठेकेदाराची ‘सक्त वसूली’

बाजारात ठेकेदाराची ‘सक्त वसूली’
गडहिंग्लजमधील चित्र; पालिकेकडे तक्रार देण्याचे मुख्याधिकाऱ्‍यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : शहरातील दैनंदिन आणि आठवडा बाजारात येणाऱ्‍या विविध विक्रेत्यांकडून ठेकेदाराची ‘सक्तवसूली’ सुरु असल्याच्या तक्रारींचा पाढा पालिका प्रशासनासमोर वाचला. यानंतर मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी बाजार कर वसूलीत अरेरावी आणि गैरवर्तन केल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
शहरात दैनंदिनसह आठवडी बाजार, विविध सण-उत्सव, ऊरुस आणि इतर कारणामुळे लावलेल्या विविध स्टॉल, भाजी, फळविक्रेते, हातगाडेधारक, मटण मार्केट कत्तलखाना फी वसूलीचा ठेका पालिकेतर्फे दिला आहे. बाजार करवसूलीचे दर सभागृहाने २०१८ मध्येच निश्‍चित केले आहेत. त्या दरानुसारच आतापर्यंत वसूली होते. परंतु, सध्याच्या ठेकेदाराकडून पालिकेच्या दरपत्रकालाच फाटा देण्याचे काम सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतात कष्ट करुन शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी शहरात येतात. सध्या अंब्याचा हंगाम सुरु असल्याने शेकडो आंबा विक्रेते येतात. एका बुट्टीला २० रुपये दर आहे. परंतु, ठेकेदाराकडून ३० रुपयांची वसूली सुरु असल्याची तक्रार आहे. तसेच रिक्षा, लहान टेंपोसाठी ५० रुपये असताना दीडशेची, तर मोठ्या टेंपोसाठी १०० ऐवजी १५० रुपये घेत असल्याची तक्रार शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनी मुख्याधिकाऱ्‍यांकडे केली आहे. तसेच ठाकरे शिवसेनेनेही यासंदर्भात पालिकेला निवेदन दिले आहे. मुळात जागेच्या मापानुसार आकारणी न करता शेतकरी व सर्वसामान्य विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी सभागृहाने नाममात्र जागाभाडे ठरवले असताना वसूली मात्र अधिक रक्कमेची सुरु असल्याची तक्रार आहे.
दरम्यान, रविवारच्या (ता. २८) आठवडा बाजारदिवशी शेतकरी महिलेने एक बुट्टी भाजी आणली होती. तरीसुद्धा तिच्याकडून दहा रुपयाच्या तीन पावत्या देवून तीस रुपयांची वसूली केली. तीस रुपये का अशी विचारणा केल्यानंतर ठेकेदाराच्या त्या कर्मचाऱ्याने उत्तरही समाधानकारक दिले नाही. पूर्वी माणुसकीच्या भावनेतून किरकोळ भाजीपाला घेवून येणाऱ्‍या सर्वसामान्य शेतकऱ्‍यांना मुभा दिली जायची. परंतु सध्याच्या ठेकेदाराला शेतकर्‍यांच्या कष्टाचे काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. १७ लाखाला यंदा हा ठेका दिला असून ही रक्कम पालिकेला भरावी लागते. त्यावर अधिकाधिक पैसे मिळवण्यासाठी ठेकेदाराची ही सक्तवसूली संतापजनक असल्याची तक्रार विक्रेत्यांतून होत आहे.
-------------------
* आठवडी बाजार विस्कळीत
आठवडा बाजारादिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच विक्रेत्यांना बसण्याची सूचना आहे. परंतु, प्रत्येक आठवड्याला एका रस्त्यावर तीन रांगा बसलेल्या असतात. चालत जाणेही मुश्किल व्हावे असे चित्र असते. यामुळे प्रशासनाने बाजाराला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी आहे.

कोट...
पालिकेच्या दरपत्रकानुसार बाजार कर वसूली होणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक रक्कमेची वसूली होत असल्यास विक्रेत्यांनी लेखी तक्रार द्यावी. संबंधित ठेकेदाराची चौकशी करुन कारवाई करु.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी गडहिंग्लज नगरपरिषद
------------------------------------------------
श्री. अजित माद्याळे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com