
अंधांनी बनवल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू
gad294.jpg
05709
अत्याळ : नेत्रदान चळवळीमार्फत झालेल्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत अंधांनी एलईडी माळा तयार केल्या.
--------------------------------
अंधांनी बनवल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू
रोजगार प्रशिक्षणाचा समारोप; नेत्रदान चळवळीतर्फे केले होते आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : दृष्टीच नाही. त्यामुळे कोणत्याही वस्तूला हात लावताना मनामध्ये निर्माण होणारी भिती. त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटले की त्यापासून चार हात लांबच. पण, याच दृष्टीहीन व्यक्तींच्या हातांनी चक्क इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचे धडे गिरवले.
अगदी किचकट मानल्या जाणाऱ्या एलईडी माळाही त्यांनी बनवल्या. निमित्त होते अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे. जिल्ह्यात प्रथमच मरणोत्तर नेत्रदान चळवळीमार्फत सात दिवस ही कार्यशाळा झाली. अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेला २२ मे रोजी प्रारंभ झाला. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील १२ अंध या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पाच टप्प्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिले. पहिल्या टप्प्यात स्वीच, होल्डर, वायरची जोडणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या टप्प्यात एलईडी बल्बच्या निर्मितीचे त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. तिसऱ्या टप्प्यात सोलरवर चालणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या टप्प्यात अंधांकडून उत्सवप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या एलईडी माळा तयार करुन घेण्यात आल्या. पाचव्या टप्प्यात आपण तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री कौशल्याबाबत मार्गदर्शन केले. अंध उद्योजक सागर पाटील यांनी प्रशिक्षण दिले. त्यांना सुशांत चौगुले यांनी सहकार्य केले.
दरम्यान, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेत सहभागी बारा अंधांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. योगशिक्षक शशिकांत मोहिते यांचा विशेष सत्कार झाला. प्रशिक्षक सागर पाटील यांनी अंधांनी जीवनात सकारात्मक राहून वाटचाल करावी, असे आवाहन केले. डॉ. पाटणे यांचेही भाषण झाले. विविध गावातील नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------
योग आणि प्रेरणादायी व्याख्यान...
नेत्रदान चळवळीमार्फत अंधांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम सुरु आहे. त्यासोबतच शारिरीक व मानसिकदृष्ट्याही कणखर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्यशाळेच्या कालावधीत सकाळच्या सत्रात योग प्रशिक्षण झाले. योगशिक्षक शशिकांत मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तर सायंकाळच्या सत्रात रेल्वेत निवड झालेला अंध युवक माधव नाईक, पीएचडी करणारी अंध युवती रतन गुरव, डॉ. विश्वनाथ पाटील यांची व्याख्याने झाली. तसेच अंध संगीत शिक्षक संदीप सोनटक्के यांचा गायनाचा कार्यक्रम झाला.